अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
संगमनेर येथून अहिल्यानगर शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर (वय 25) व सचिन प्रताप कतारी (वय 26, दोघे रा. संजय गांधी नगर, संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा आठ किलो 535 ग्रॅमचा गांजा व पाच लाखांची कार असा सहा लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मंगळवारी (15 एप्रिल) रात्री 11 वाजता पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात ही कारवाई करण्यात आली. सोनानगर चौकातील विराम हॉटेल समोरील मोकळ्या जागेत एक राखाडी रंगाची होंडा कंपनीची चारचाकी (एमएच 01 एई 7213) वाहन उभे असून त्यात दोन इसम गांजा विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती निरीक्षक कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक अमोल भारती यांना माहिती दिली. त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या.
पोलीस, पंच, नायब तहसीलदार यांचे पथक सदर ठिकाणी पोहोचले असता, संशयित वाहन आढळून आली. त्या वाहनात संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर व सचिन प्रताप कतारी हे इसम आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता डिक्कीमध्ये एक पांढर्या रंगाची गोणी आढळून आली, ज्यात आठ किलो 535 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा आढळला. याप्रकरणी संशयितांविरूध्द एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम 8 (क), 20 (ब), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत.
अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कोकरे, नायब तहसीलदार गणेश भानवसे, उपनिरीक्षक पाटील, अंमलदार योगेश चव्हाण, सुधीर खाडे, भानुदास खेडकर, सुनील चव्हाण, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, वसीम पठाण, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, सतीश भवर, सागर साबळे, सुजय हिवाळे, महेश पाखरे, बाबासाहेब भापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.