अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगारमधील बेलेश्वर चौक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा इसमांना भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 95 हजार 500 रुपये किमतीचा 9.55 किलो वजनाचा गांजा आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख 10 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई रविवारी (18 मे) सायंकाळी करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार रवींद्र टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमीदाराच्या माहितीवरून पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मूलगीर, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलेश्वर चौक परिसरात सापळा रचण्यात आला. काही वेळाने संशयास्पद हालचाल करणारे दोन इसम एका पांढर्या गोणीसह आढळून आले. त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे संभाजी छगन गर्जे (वय 31, रा. मेहकरी, ता. अहिल्यानगर) व विजय अनिल साळवे (वय 38, रा. इमामपुर, ता. अहिल्यानगर, सध्या रा. गांधीनगर, एमआयडीसी) अशी सांगितली.
त्यांच्याकडील हिरो होंडा दुचाकी (एमएच 16 झेड 3515) व पांढर्या रंगाची गोणीची तपासणी केली असता, त्यामध्ये हिरव्या रंगाचा उग्र वास असलेला अंमली पदार्थ गांजा सापडला. गांजाचे वजन 9.55 किलो इतके आहे. पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल सीलबंद केला असून, दोन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर एन.डी.पी.एस. कायदा 1985 च्या कलम 8 (क), 20 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.