अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भरधाव वेगातील कारने रस्ता ओलांडणार्या 55 वर्षीय वारकर्यास जोराची धडक (Accident) दिली. या अपघातात वारकर्याचा मृत्यू झाला. ही घटना इमामपूर (ता. नगर) शिवारात शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता घडली. अशोक नामदेव चव्हाण (वय 55, रा. चिंचखेड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात मयत झालेल्या वारकर्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अज्ञात कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हभप सोमनाथ रघुनाथ कर्डिले (वय 32, रा. चापानेर, ता कन्नड, जि.छत्रपती संभाजी नगर) यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून वारकर्यांच्या हजारो दिंड्या सध्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे (Pandharpur) निघालेल्या आहेत. हभप सोमनाथ कर्डिले महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे जाताना शुक्रवारी सकाळी इमामपूर येथे नाश्ता करण्यासाठी थांबली होती. त्यावेळी इमामपूर (Imampur) शिवारातील महादू भिमाजी कराळे (भैरोबाचा मळा) यांच्या घरासमोर त्यांच्या दिंडीतील वारकरी चव्हाण हे रस्ता ओलांडत असताना पांढर्या रंगाच्या भरधाव वेगातील कारने (क्रमांक माहित नाही) त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातात (Accident) चव्हाण यांचा मृत्यू (Death) झाला असे हभप कर्डिले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी आणि उपनिरीक्षक मोंढे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक मोंढे करत आहेत.