जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed
बीडहून जामखेडकडे येत असलेले चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रविवारी (दि.2) बीड रोडवरील सुराणा पेट्रोलपंपाजवळ पल्टी होऊन झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारने तीन पलट्या मारल्या. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड शहरापासून दोन किमी अंतरावरील बीड रोडवर रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील चारजण पुणे येथे नोकरीच्या कामानिमित्त कारने (एम.एच. 15, एच.यु 1226) चालले होते.
त्यांची गाडी सुराणा पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये आकाश संतोष भोसले (वय 28), अक्षय अजिनाथ जायभाय (वय 28) व मोहम्मद बशीर शेख (वय 28, तिघेही रा. सावरगाव घाट, ता. पाटोदा, जिल्हा बीड) गंभीर जखमी झाले तर रोहित महादेव झिंजुरके हा कीरकोळ जखमी झाला.
दरम्यान, जामखेड पोलीस ठाण्याचे हेड पोलीस कॉन्स्टेबल प्रविण इंगळे हे बीडरोड येथे एका चोरीचा तपास करण्यासाठी आले होते. त्यांच्यापासून जवळच्या अंतरावर हा अपघात घडला. त्यामुळे त्यांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनद्वारे माहिती दिली. संजय कोठारी हे तातडीने आपली रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी आले. इंगळे, कोठारी, सचिन गाडे, विशाल ढवळे, तनवीर मुलानी यांच्या मदतीने जखमींना जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.