अकोले |प्रतिनिधी| Akole
कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील अकोले जवळील पथिक पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी रामचंद्र मेंगाळ यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. दुचाकी व कार यांच्यात भीषण अपघात घडला होता. या अपघातात रामचंद्र लक्ष्मण मेंगाळ, वृषाली अनिल कडाळी व रोहिणी सुनील मेंगाळ हे दुचाकीवरील तिघे जखमी झाले होते. यातील रामचंद्र मेंगाळ हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर जखमींना अकोलेतील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रामचंद्र मेंगाळ व वृषाली कडाळी यांना गुरुवारी रात्रीच पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले होते. तेथे रामचंद्र मेंगाळ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात शुक्रवारी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या मुलाने वडिलांचे काही बरेवाईट झाले तर आपण त्यांचा अंत्यविधी रोहिदास जाधव यांच्या घरासमोर करू असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अंबड येथे जाधव यांच्या घरासमोर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
यावेळी ग्रामस्थ व कार्यकर्ते हेही त्यांच्या घरी जमा झाले होते. त्यामुळे काहीवेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुपारी गर्दणी (ता. अकोले) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत जखमी रोहिणी मेंगाळ हिने दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी कारचालक रोहिदास किसन जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ज्याठिकाणी हा अपघात घडला होता त्या पथिक पंपासमोरील खड्डे शुक्रवारी बुजविण्यात आले.





