शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
चारचाकी वाहनाच्या (Vehicle) दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी 5 लाख 34 हजार रुपयांवर डल्ला (Money Theft) मारल्याची घटना शहरातील गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सोमवारी भरदुपारी घडली. याप्रकरणी चैतन्य अशोक नरवडे (रा. खंडोबानगर, शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य नरवडे सोमवारी दुपारी अमरापूर (Amrapur) येथील श्री शिवपार्वती या त्यांच्या पंपावरून 2 लाख 19 हजार रुपये घेऊन कारने शहरातील आंबेडकर चौकामध्ये आले.
तहसिलदार यांच्या निवासासमोर गाडी पार्क केली. ते दुचाकीवरून पाथर्डी (Pathardi) रस्त्यावरील एका पतसंस्थेत गेले. तेथे ठेवलेले 3 लाख 15 हजार रुपये काढून पुन्हा आंबेडकर चौकात आले आणि सोबतची रक्कम कारमध्ये ठेवली. ते मित्राच्या दुचाकीची चावी देण्यासाठी शेजारील हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर पाच मिनिटांत आपल्या वाहनाकडे आले, तर वाहनाच्या डाव्या बाजूची पुढील काच फुटलेली त्यांना दिसली. कारची (Car) तपसाणी केली असता पैशाची बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कमी वेळात काच फोडून पैसे लंपास करणार्या या अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली आहे.
याबाबत पोलीस ठाण्याशी संपर्क केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी सर्व चौकातील व आसपासच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याबाबत नरवडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात (Shevgav Police Station) अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत.




