Saturday, September 14, 2024
Homeनगरगाडीची काच बंद झाल्याने चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू

गाडीची काच बंद झाल्याने चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव शहरानजीक असलेल्या जेऊर पाटोदा शिवारात साडेतीन वर्षांचा बालक राघव सागर कुदळे हा चारचाकी वाहनात खेळत असताना खिडकीची काच बंद झाल्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. राघवचे आजोबा भाऊसाहेब गमाजी कुदळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जेऊर पाटोदा या ठिकाणी भाऊसाहेब कुदळे यांचे कुटुंब राहते. त्यांच्याकडे पशुधनाच्या चार्‍यासाठी एक चार चाकी वाहन आहे. त्यांनी हे वाहन शनिवारी सकाळी घरासमोर उभे करून ठेवले व ते आपल्या कामात व्यस्त होते. दरम्यान त्यांचा नातू राघव खेळत-खेळत गाडीकडे गेला. गाडीत बसून खेळत असताना त्याच्याकडून चुकून काच बंद करण्याचे बटन दाबले गेले, त्यात त्याची मान अडकून त्याचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना जेव्हा घरच्या माणसांच्या लक्षात आली त्यावेळी खूप उशीर झाला होता. त्यास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच्या आजोबांनी माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वांढेकर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या