श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा ते जामखेड महामार्गावर घायपतवाडी शेजारी शेळ्या राखणारा वयोवृद्ध बाजीराव दांडेकर (वय 65, रा. दांडेकरमळा, श्रीगोंदा) यांना आढळगाव येथील कारचालकाने मंगळवारी (दि.17) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दोन वाहनांच्या रस्त्यावर लागलेल्या रेसमध्ये वाहनावर नियंत्रण न मिळवता आल्याने वृद्धाचा बळी गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंद्यातून एम एच 16 डिएम 7088 या कारने आढळगावच्या दिशेने जोराने चालताना, श्रीगोंदा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर घायपतवाडी शेजारी चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला शेळ्या चारत असलेल्या बाजीराव दांडेकर (वय 65) या व्यक्तीला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वयोवृद्ध व्यक्ती जागीच गतप्राण झाली.
दरम्यान, धडक बसल्यानंतर दांडेकर कारच्या बोनेटवर आपटले आणि जवळपास पंचवीस मीटर त्या अवस्थेत फरपटत गेले. कारचालक पळून जाण्याचा प्रयत्नात असताना समोरून येणार्या प्रवाशांनी कारचालकाला थांबवून घेराव घातला. कार आढळगावची असल्याचे समजते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी कारचालक नशेत असल्याचे सांगितले.





