Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसमृद्धी महामार्गावर कार अडवून दागिने, लाखो रुपयांची रोकड लुटली

समृद्धी महामार्गावर कार अडवून दागिने, लाखो रुपयांची रोकड लुटली

११ ते १२ जणांच्या टोळीचा समावेश

- Advertisement -

वावी | वार्ताहर vavi

समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात रात्रीच्या वेळी कार अडवून ११ ते १२ अज्ञात व्यक्तींनी कुटुंबीयांना मारहाण करत तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली. कारचे टायर फोडून प्रवाशांना लक्ष्य करण्यात आल्याने महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकांत राजेंद्रसिंग मिश्रा (३७) हे कुटुंबीयांसह कार क्रमांक एम. एच. २० जी. के. ०२०२ मधून समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात होते. गुरुवारी (दि. २७) रात्री साडेअकराच्या सुमारास मलढोण शिवारातील समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक ५४२.१ जवळ त्यांच्या कारच्या पुढील चाकासमोर लोखंडी वस्तू टाकण्यात आली. त्यामुळे वाहनाचे टायर फुटून कार थांबली.कार थांबताच मागून आलेल्या अंदाजे ११ ते १२ अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने रोकड तसेच सोन्याचे दागिने काढून घेतले.

या लुटीत सोन्याच्या अंगठ्या, चैन, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, कुड्या आदी दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार देविदास माळी व शहाजी शिंदे करीत आहेत. घटनेमुळे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

रात्री तीन वाहनांना लक्ष्य केल्याची चर्चा
दरम्यान, याच परिसरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी जवळपास तीन वाहनांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. यातील एका कारचे टायर फुटल्यानंतर १० ते १२ जणांनी कारजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारमधील व्यक्तीने स्वतःच्या सुरक्षेसाठी पिस्तुलातून गोळीबार केल्याने संशयितांनी तेथून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान पोलिसांकडून एका घटनेतील कारची चौकशी सुरू असतानाच दुसऱ्या कारलाही लुटण्यात आल्याचे समजते. या घटनांची अधिकृत पडताळणी व तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वावीला समृद्धीचा एक्झिट पॉईंट देण्याची गरज
वावी पोलिस ठाणे आणि समृद्धी महामार्गातील अंतर अवघे एक किलोमीटरच्या आसपास असले तरी महामार्गावर थेट जाण्यासाठी पोलिसांना सुमारे 20 किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठा विलंब होण्याची शक्यता आहे. अपघात, लूट अथवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास पोलिसांसह रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी वावी परिसरात समृद्धी महामार्गाला थेट एक्झिट पॉईंट देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : कोपरगावात महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon जळगाववरून बेलापूरकडे प्रवास करणार्‍या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या थरारक दरोड्याच्या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. 18 ऑक्टोबर 2026...