शहादा | ता.प्र. nandurbar
एक लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या तालुक्यातील दरा येथील वनपाल, वनरक्षक व खाजगी पंटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदाराच्या लहान भावावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यात तक्रारदाराच्या भावास अटकही करण्यात आली आहे. या दाखल गुन्ह्यात तसेच जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी शहादा येथील खाजगी पंटर नदीम खान पठाण याने दरा येथील वनपाल संजय मोहन पाटील व वनरक्षक दीपक दिलीप पाटील यांच्यासाठी दि. ८ मे २०२३ रोजी तक्रारदाराकडून दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दि. ९ मे रोजी त्यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. त्याला वनपाल व वनरक्षक यांनी प्रोत्साहन दिले. तसेच सरकारी वकीलाकरिता २५ हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पो.ना.नितीन कराड, पो.ना प्रभाकर गवळी, पोना प्रवीण महाजन यांच्या पथकाने केली. त्यांना पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्परपोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक नरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले.