Thursday, September 19, 2024
Homeनगररामगिरी महाराजांवर वैजापूर, नगर, संगमनेरात गुन्हे दाखल

रामगिरी महाराजांवर वैजापूर, नगर, संगमनेरात गुन्हे दाखल

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सराला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर वैजापूर, येवल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील तोफखाना आणि संगमनेरातही गुन्हा दाखल करण्यात आला.

पण सदरची घटना नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी घडलेली असल्याकारणाने संगमनेर पोलिसांनी पुढील तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून श्रीरामपुरात निषेध सभा घेण्यात आली, संगमनेर, नगर आणि छ. संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात येऊन मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणाऱ्या रामगिरी महाराज यांच्याबाबत संताची लाट असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

हिंदूंनी संघटित राहावं

आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मागनि चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टीकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आहोत. आमचा उद्देश हाच आहे, हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं. असंघटितपणामुळे आजपर्यंत फायदा घेतला गेलाय. जे असेल ते असेल. गुन्हा दाखल झाला असेल नोटीस येईल तेव्हा बघू, अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराज यांनी दिली.

बांगलादेशात जो प्रकार घडला, आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल ३० जणांनी बलात्कार केला. कोटी दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की, हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं. बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो. त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.

संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही-मुख्यमंत्री

नाशिक- राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात रोष बघायला मिळतोय. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर बघायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं. या राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. या राज्यात संत परंपरा ही मोठी आहे. संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार सुरू आहे, म्हणून या महाराष्ट्रात संताच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.. सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे सदगुरू योगिराज गंगागिरी महाराज१७७ वा अखंड हरिनाम सप्ताह महंत रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. येथे त्यांनी हे वक्तव्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या