Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजVishalgad Encrochment: संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांवर गुन्हा दाखल

Vishalgad Encrochment: संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाळगड आणि पायथ्याला झालेल्या हिंसक घटनानंतर कोल्हापूर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी या सर्वजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या १० पेक्षा अधिक कलमांतर्गत शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीराजे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहे. त्यांनी रविवारी ‘चलो विशाळगडचा नारा’ दिला होता. शिवभक्तांसह ते विशाळगडावर गेले होते. अज्ञातांनी विशाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या काही गावांमध्ये धुडगूस घातला. यावेळी काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला होता. त्यांच्यावर दगडफेक केली, घरांची तोडफोड केली तसंच वाहनांची देखील तोडफोड केली होती. या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाले होते. यामुळे या अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण आले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या