दहिवड | वार्ताहर
देवळा सौन्दाणे रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी गावाजवळ असलेल्या एम के पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या खिशातील रोख रक्कम चोरून पळ काढणाऱ्या ३ चोरांवर देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवळा-सौन्दाणे रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी गावाजवळ असलेल्या एम के पेट्रोल पंपावर दि.२४ फेब्रुवारीच्या पहाटे २.३० ते ३.०० वाजेच्या दरम्यान ३ युवक बिना नंबरची पल्सर दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले असता, गाडीत पेट्रोल भरल्यानंतर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत त्या ठिकाणी दहशत माजवत पेट्रोल पंप कर्मचारी अजय बनवरीलाल यादव यांना मारहाण करत त्यांच्या खिश्यातील ६ हजार १४० रु चोरून पळ काढला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी हिम्मत दाखवत संशियित आरोपींना पकडले.
सापडलेले संशयित आरोपी सचिन बाळू आहिरे, रोशन बाळू अहिरे हे दहिवड येथील तर कुणाल संजय पवार हा कणकापूर येथील रहिवासी आहेत.
पेट्रोल पंप कर्मचारी अजय यादव यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते व एपीआय दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार बी एन सोनवणे हे करीत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा