नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad
मध्यरात्री भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करून फटाके फोडून धांगडधिंगाणा व आरडाओरड करणाऱ्या चार जणांना नाशिकरोड पोलिसांनी चांगलाच चोप दिला असून हे सर्वजण रुग्णवाहिका चालक आहे. हा प्रकार नाशिकरोड परिसरातील राधा मोहन रो हाऊस, सिन्नर फाटा, खरजुळ मळा, नाशिकरोड या ठिकाणी घडला.
रात्री दहा वाजेनंतर फटाके फोडू नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना या आदेशाची पायमल्ली करून भर रस्त्यावर फटाके फोडत आरडाओरड आणि धांगडधिंगाणा करून वाढदिवस साजरा करणाऱ्या शिवाजी पांडुरंग गायधनी, शेखर पांडुरंग गायधनी (रा. राधा मोहन रो हाऊस सिन्नर फाटा खरजुल मळा नाशिक रोड) तसेच आकाश रवींद्र जारस (रा. भारती कॉम्प्लेक्स शेजारी सुभाष रोड नाशिक रोड) व भारत प्रसाद सालकर (रा. गोसावी वाडी नाशिक रोड) हे चौघेही मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास केक कापून वाढदिवस साजरा करत होते.
ते रस्त्यावर धांगडधिंगाणा व आरडाओरड करून वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना समजताच त्यांनी पोलिस हवालदार सागर विष्णू जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना आदेश देऊन संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर हवालदार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला असता सिन्नर फाटा परिसरात खरजुल मळा परिसरात हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी या चौघांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी चौघेही पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले.
त्यानंतर पोलिसांनी त्यांना चांगला चोप दिल्याने चौघेही शांत झाले. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलीस हवालदार सागर जाधव यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे चौघेही जण रुग्णवाहिका चालक असून या प्रकाराची नाशिकरोड परिसरात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, नाशिकरोड परिसरात भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धांगडधिंगाणा घालण्याचे प्रकार नेहमीच होतात. पोलिसांनी गस्त वाढवून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.