Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याजातनिहाय जनगणना होणे आवश्यक - नाना पटोले

जातनिहाय जनगणना होणे आवश्यक – नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजाचे मोठे योगदान आहे, पण आजची परिस्थिती वेगळी आहे. जे लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते त्यांच्या हातात सत्ता गेली असून हेच लोक संविधान संपवण्याचे काम करत आहेत. भाजप (BJP) आणि मोदी सरकार हे बहुजन समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतात, अधिकार मात्र काहीच देत नाहीत, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बहुजन समाजाला न्याय मिळवायचा असेल तर जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका सोमवारी (दि.०७) रोजी जालना (jalna) येथे बोलताना मांडली.

- Advertisement -

जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सामाजिक न्याय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी जातनिहाय जनगणनेची (Census) मागणी केली. ते म्हणाले की, केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ओसीबी समाजाचा सविस्तर डेटा बनवला होता. पण नंतर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने तो जाहीर केला नाही. भाजपच्या मनात पाप आहे, बहुजनांना फायदा होऊ नये ही त्यांची भूमिका आहे. बहुजन समाजाला न्याय मिळावा यासाठी न्यायमूर्ती रेणके समितीने देशभरातून अभ्यास करुन केंद्र सरकारला अहवाल सादर केला. पण नंतर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्यावर उपसमिती नेमली आणि बहुजन समाजाला (Bahujan Society) न्याय देण्यापासून वंचित ठेवले, असा आरोप पटोले यांनी केला.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षच बहुजन समाजाला न्याय देऊ शकतो. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वतः जातनिहाय जनगणनेचा प्रस्ताव सादर करून तो मंजूर करुन घेतला, त्यानंतर देशातील इतर राज्यातून तसे प्रस्ताव मंजूर करणात आले. सर्व जातींना न्याय देण्याचा काँग्रेसचा (Congress) प्रयत्न असून केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन कर्नाटक विधानसभेच्या निवडणुक प्रचारात राहुल गांधी यांनी दिले आहे. बहुजन समाजाने आता जागे झाले पाहिजे आणि समाजाच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.

दरम्यान, मेळाव्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही, मनमानी सरकारविरोधात देशभरातील प्रमुख पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने आघाडी स्थापन केली आहे. या नावावरही भाजप आक्षेप घेत आहे. भाजपला मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया चालते तर मग ‘इंडिया’ का चालत नाही? असा सवाल पटोले यांनी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या