मुंबई | Mumbai
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन दिशा सालियनचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष सीबीआयने (CBI) तपासानंतर काढला आहे.
८ जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून २८ वर्षीय दिशा पडली होती. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासासोबतच सुरू होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला आहे.
विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलाने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा वारंवार आरोप केला होता. एवढंच नाहीतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही केला होता. मात्र सीबीआयच्या या निष्कर्षानंतर राणे पितापुत्रांच्या या आरोपांना आता तरी पूर्णविराम मिळणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.