मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. त्यासाठी एसआयटीने कराडला ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी (Police) कराडसह ८ आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी (CID) कार्यालयात ३१ डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले होते. मात्र आत्मसमर्पण करण्यापूर्वी कराड फरार होता. अशातच आता आत्मसमर्पण करण्यापूर्वी कराड आणि त्याचे साथीदार कुठे पळाले होते याचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
सरपंच संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणात आरोप असलेला वाल्मीक कराड व इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला (Beed to Pune) गेल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.याविषयीचे पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यात ३० डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन आलिशान गाड्यांमधून कराड पुण्याला गेल्याची चर्चा आहे. कारण पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसमध्ये कराडने आत्मसमर्पण केले होते त्यावेळी ज्या गाडीतून तो आला ती गाडी याच ताफ्यातील होती, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, खंडणी आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने (Court) वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. कारण वाल्मिक कराडवर मकोका गुन्ह्याची नोंद झाली आहे. मकोका अंतर्गत कारवाईत किमान १८० दिवस आरोपीला जामीन मिळत नाही. त्यामुळे कराड पुढील १८० दिवस म्हणजेच ६ महिने तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही, असे बोलले जात आहे.