Monday, May 27, 2024
Homeअग्रलेखउत्सव प्रिय: खलू मानवा:

उत्सव प्रिय: खलू मानवा:

भारतीय संस्कृतीत (Indian culture) सणांची (festivals) समृद्ध परंपरा आहे. प्रांता-प्रांतात सणांची नावे फक्त वेगवेगळी असतात. महाराष्ट्रात होळी (Holi) साजरी केली जाते. त्याचवेळी आसाममध्ये फागुवा, गोव्यात उक्कुली, कर्नाटकात बेदारा वेश, मणिपूरमध्ये याओसांग साजरी केली जाते. ही सगळी होळीचीच रूपे. सणांची नावे भलेही वेगळी असोत, तथापि लोकसहभाग (Public participation)हा सण साजरे करण्यामागचा उद्देश मात्र एकच असतो.

लोकांनी एकत्र यावे, सणांच्या निमित्ताने वर्षातील काही दिवस त्यांच्या दैनंदिन जगण्याच्या तोचतो पणातून काही दिवस मुक्ती मिळावी, त्यात आनंद वाढवणारा बदल व्हावा आणि सण साजरे करण्याच्या पद्धतीतून संस्कृतीचा वारसा पुढील पिढीकडे सहज हस्तांतरित व्हावा हा सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यामागचे हेतू असावेत.

- Advertisement -

श्रावण महिन्यानंतर तर सणांची अगदी रेलचेल असते. वर्षभर येणारे सगळेच सण लोक उत्साहाने साजरे करतात. ‘उत्सव प्रिय: खलु मानवा:’ असे कवी कालिदासाने म्हटले आहे. अर्थात माणसे उत्सवप्रिय असतात. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने माणसे त्याचीच अनुभूती सध्या घेत आहेत.

करोनामुळे सार्वजनिकरित्या सण साजरे करण्यावर काही निर्बंध आहेत. पण उत्साह मात्र तसूभरही कमी झाल्याचे दिसत नाही. गणरायाचे स्वागतही जोरदार झाले. यंदा गणेशोत्सवातील देखावे बघण्यासाठी गर्दी करता येणार नसली तरी काही मोठ्या मंडळांचे मांडव नटले आहेत.

बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान झाले आहेत. काळाबरोबर सण साजरे करण्याची पद्धतही बदलते. त्या बदलाप्रमाणे सगळेच सण ‘आवाजी’ होतात की काय आणि सण साजरे करण्यामागचे उद्देश बाजूला पडून फक्त मउत्सवीपणफ शिल्लक राहाते की काय असा प्रश्न जाणत्यांना पडत होता.

प्रदूषणाची समस्याही गंभीर बनत होती. तथापि सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांमुळे जाणीवजागृती वाढत आहे. सण साजरे करण्याच्या पद्धतीत होकारात्मक बदल होत आहेत.

‘एक गाव; एक गणपती’ या संकल्पनेची स्वीकारार्हता वाढत आहे. यंदा सिन्नर तालुक्यातील वावी गाव परिसरातील 25-30 गावांमध्ये प्रत्येकी एकच गणपती बसवण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हीच परंपरा वर्षानुवर्षे पाळली जाते.

याच जिल्ह्यातील माजलगाव मधील एका मंडळाने करोना लसीकरण शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नाशिकमधील एका सामाजिक संस्थेने निर्माल्य संकलनासाठी पिशव्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी मझाडाचा गणपतीफ उपक्रम राबवला. चिंच,बहावा, सीताफळ, रामफळ अशा काही झाडांच्या बियांचा वापर करून शाडू मातीचे बाप्पा तयार केले. वनविभागाने देखील शाडू मातीच्या गणेशमूर्तींबरोबर देशी वृक्षाच्या रोपांचे वाटप केले. हळूहळू अन्य सण साजरे करण्याबाबतही असेच विधायक विचार सुरु झाले आहेत.

दिवाळीत ध्वनिप्रदूषण होऊ नये असे प्रयत्न गेली काही वर्षे जोर धरत आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सणांमागचा उद्देशही लोकांपर्यत पोहोचावा असे प्रयत्न अनेक संस्था करत आहेत. ते कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहेत.

अशा उपक्रमांची संख्या वाढत जाईल का? गणपतीबाप्पा हे बुद्धीची देवता मानले जातात. पर्यावरणपूरक आणि लोकहिताला पोषक असेच सण साजरे करण्याची बुद्धी त्याने सर्व भक्तांना द्यावी हीच त्याच्या चरणी प्रार्थना!

- Advertisment -

ताज्या बातम्या