मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासात ७०५ कोटींचा घोटाळा झाल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई केली आहे. जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचा मुलगा संजय रेड्डी यांच्यासह एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे काही अधिकारी आणि नऊ कंपन्यांविरोधा गुन्हा दाखल केला आहे.
२०१२ ते २०१८ या कालावधीत जीव्हीके आणि इतर कंपन्यांनी जवळपास ७०५ कोटींचा घोळ केला आहे, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय विकासाच्या नावाखाली विमानतळ परिसरातील २०० एकर जमीन देखील हडप केली आहे असा संशय आहे. सहार येथील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास जीव्हीके कंपनीने खासगी सार्वजनिक भागीदारीतून केला होता. यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग कंपनीची ५०.५० टक्के हिस्सेदारी आहे.