Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राचा हिरवा कंदील

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राचा हिरवा कंदील

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या औरंगाबाद (Aurangabad )आणि उस्मानाबादच्या(Osmanabad ) नामांतराला केंद्र सरकारने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबाद शहराचे ‘धाराशिव’ असे नामांतर होणार आहे.

मात्र, या दोन्ही जिल्ह्याचे मूळ नाव कायम राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला आपली हरकत नसल्याचे कळविले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड घडवून आणल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या म्हणजे २९ जून २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आल्यानंतर या सरकारने १६ जुलै २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मांडून तो मंजूर केला होता. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात २५ ऑगस्ट २०२२ रोजी नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

विधिमंडळात ठराव झाल्यानंतर राज्य सरकारने २० ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्र सरकारला नामांतराबाबत प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला आपली कोणतीही हरकत नसल्याचे केंद्र सरकारने आज कळविले. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची पुढील प्रक्रिया आता सुरु होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या