Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याLok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; महाराष्ट्रात १९ ...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; महाराष्ट्रात १९ एप्रिलला मतदान, ४ जूनला मतमोजणी

नवी दिल्ली | New Delhi

देशातील सर्वात मोठा राजकीय उत्सव समजल्या जाणाऱ्या आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता देशात १९ एप्रिल ते १ जून अशा सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यातील पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी या संपूर्ण निवडणुकांची मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे…

- Advertisement -

यात महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये ४८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे या तारखांना मतदान होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २६ एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात मतदान होईल.

तर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा एकूण ११ मतदारसंघांत मतदान होणार आहे. तसेच चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड अशा ११ मतदारसंघांत मतदान होईल. तर पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई अशा एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

Lok Sabha Election 2024 : नाशिक, दिंडोरी, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांत ‘या’ दिवशी होणार मतदान

देशात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार असून यात १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. तसेच यंदाच्या निवडणुकीत ४९.७ कोटी पुरुष तर ४१.१ कोटी महिला मतदार मतदान करणार आहेत. याशिवाय १.८२ कोटी नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत ८२ लाख प्रौढ तर ४८ हजार तृतीयपंथी मतदार आहेत. तसेच निवडणुकीसाठी देशभरात दीड कोटी निवडणूक अधिकारी राहणार असून निवडणुकीसाठी ५५ लाखांपेक्षा अधिक EVM सज्ज आहेत. याशिवाय साडे दहा लाख पोलिंग बूथ देखील असणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

यावेळी माहिती देताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) म्हणाले की, देशातील १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत वाढली आहे. त्यांच्या मतांचाही निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही. तर २ लाख मतदार भारतात असे आहेत ज्यांचं वय १०० हून जास्त आहेत. आमच्याकडे असलेल्या यादीत ४८ हजार तृतीयपंथीय आहेत, अशीही माहितीही राजीव कुमार यांनी दिली. तसेच ज्येष्ठ नागरिक जेव्हा मतदानासाठी येतील तेव्हा तिथे व्हिल चेअरची आणि अटेंडंटची व्यवस्था असेल. आम्ही अशा नागरिकांची मतं घरी जाऊनही घ्यायला तयार आहोत. मात्र जर या नागरिकांना मतदान केंद्रावर यायचं असेल तर त्यासाठीही आम्ही तयारी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे. याशिवाय कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲपवर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोहचतील. तसेच आमच्यासमोर हे सगळं करताना एकूण चार आव्हाने होती. यामध्ये मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचे सगळ्यात मोठे आव्हान होते. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले.

तसेच निवडणुकांमध्ये दारु, साड्या पैसे वाटणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. याशिवाय ८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल. तर कोणताही प्रचार होताना कोणत्याही प्रकारची मर्यादा न ओलांडण्याचे आदेश राजकीय पक्षांना देण्यात आले आहेत. जर असे झाल्यास राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील प्रचारात सामावून घेता येणार नाही, असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या