अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला लगाम घालण्यासाठी राज्य शासनामार्फत मार्च महिन्यांपासून 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत निश्चित केलेल्या 36 हजार 772 च्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ 3 हजार 500 मुलींनाच (9.50 टक्के) ही लस टोचण्यात आली आहे. आता मोहिमेचे अखेरचे तीन महिने शिल्लक असून, ऑक्टोबरअखेर उर्वरित 33 हजारांहून अधिक मुलींचे लसीकरण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.
लसीकरणाची संथ गती आणि कमी प्रतिसादजिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस विनामूल्य दिली जात आहे. तरीही जनजागृतीचा अभाव आणि गैरसममांमुळे लसीकरणाचा वेग अत्यंत मंदावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी गर्भाशय मुख कर्करोगाचे 1 लाख 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळतात, तर सुमारे 80 हजार महिलांचा यामुळे मृत्यू होतो. जगभरातील या कर्करोगाने होणार्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 25 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. या गंभीर आजाराला अटकाव करण्यासाठीच राज्य सरकारने 9 मार्चपासून ही विशेष मोहीम सुरू केली आहे. कर्करोगाची लक्षणे आणि प्रतिबंधक उपायगर्भाशय मुखाचा कर्करोग हा उच्च जोखमीच्या एचपीव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होतो. याशिवाय कमी वयात लैंगिक संबंध, बहुल लैंगिक भागीदार, धूम्रपान, एचआयव्ही संसर्ग, कमी प्रतिकारशक्ती, दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर आणि वेळेवर तपासणी न करणे ही याची प्रमुख कारणे आहेत.
प्रारंभिक टप्प्यात याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, नंतरच्या टप्प्यात संभोगानंतर किंवा असामान्य रक्तस्राव, दुर्गंधीयुक्त स्राव, कंबर व ओटीपोटात वेदना, वजनात घट आणि पायांवर सूज येणे अशी लक्षणे दिसतात. एचपीव्ही लस हा यावर प्रभावी उपाय असला तरी 100 टक्के संरक्षणासाठी महिलांनी नियमित पॅप स्मिअर व एचपीव्ही स्क्रीनिंग चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच, पुरुषांनाही एचपीव्ही संसर्गामुळे मुख, जिभ आणि घशाच्या कर्करोगाचा धोका असतो.
तालुकानिहाय झालेले लसीकरण
अकोले 138, जामखेड 343, कोपरगाव 239, कर्जत 144, नगर 239, नेवासा 177, पारनेर 271, पाथर्डी 138, राहाता 143, राहुरी 167, संगमनेर 306, शेवगाव 166, श्रीगोंदा 117, श्रीरामपूर 418 आणि मनपा 172 असे 3 हजार 330 मुलींचे एचपीव्हीचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणार्या गंभीर कर्करोगांपैकी एक असला, तरी तो मोठ्या प्रमाणात प्रतिबंध करता येणारा कर्करोग आहे. एचपीव्ही लस योग्य वयात दिल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरणार्या प्रमुख प्रकारांपासून प्रभावी संरक्षण मिळते. लसीबाबत असलेल्या गैरसमजांना बळी न पडता शास्त्रीय माहितीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एचपीव्हीचे कमी लसीकरण ही निश्चितच चिंतेची बाब आहे. आरोग्य विभागासोबत शाळा, पालक, डॉक्टर आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास उर्वरित उद्दिष्ट निश्चितपणे गाठता येऊ शकते. आज आपल्या मुलींना दिलेली एचपीव्ही लस ही भविष्यातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्धची अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे.
– डॉ. सतिष सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ, अहिल्यानगर.




