अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वटपोर्णिमेच्या दिवशी सावेडी उपनगरात चेन स्नॅचिंग करण्यासाठी आलेल्या दोघांना तोफखाना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबूली दिली असून त्यांच्या ताब्यातून विना नंबरची दुचाकी, हेल्मेट व मोबाईल असा 79 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
समीर गुलाब शेख (वय 38 रा. वाळुंज पंढरपुर, जि. छत्रपती संभाजीनगर) व अमर चिलु कांबळे (वय 29 रा. मुकींदपुर, ता. नेवासा) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. वटपोर्णिमा निमित्त शहरातील महिलां पारंपरिक पध्दतीने वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी दागिने घालून बाहेर पडतात. याच संधीचा फायदा घेत संशयित चोरटे दागिने ओरबडून धूम ठोकतात. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध पथके तयार करून पायी व दुचाकीवर गस्तीचे नियोजन करण्यात आले होते.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पोलीस अंमलदार योगेश चव्हाण व सतीश भवर हे पाईपलाईन रस्त्यावरील नामदेव चौक भागात गस्त करत असताना त्यांना एका काळ्या रंगाच्या, नंबर नसलेल्या शाईन दुचाकीवर दोन संशयित इसम हेल्मेट घालून व चेहरा झाकून फिरताना दिसले. त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने पोलीस अंमलदारांनी तत्काळ पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान या इसमांनी आपली नावे समीर गुलाब शेख व अमर चिलू कांबळे अशी सांगितले.
त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांनी गुलमोहर रस्ता येथे सुमारे दीड महिन्यांपूर्वी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक शैलेश पाटील अधिक तपास करीत आहेत.




