अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आषाढी एकादशीच्या उपवासासाठी लागणारा किराणा सामान घेऊन घरी परतणार्या सेवानिवृत्त महिला कर्मचार्याला झटका देत मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना सावेडी उपनगरातील मिस्कीन मळा रस्त्यावरील हिरा मोती पान शॉपजवळ शनिवारी (5 जुलै) रात्री घडली.
या प्रकरणी देवयानी रामसिंग रघुवंशी (वय 57, रा. क्रांती चौक, सिव्हील हाडको, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होत्या आणि सध्या निवृत्त आहेत. त्या एकट्याच राहत असून निवृत्ती वेतनातूनच उदरनिर्वाह करतात. शनिवारी रात्री सुमारे 8.30 च्या सुमारास त्या आषाढी एकादशीच्या उपवासासाठी लागणारा किराणा घेण्यासाठी मिस्कीन मळा रस्त्यावरील प्रकाश प्रोव्हिजन स्टोअर्स येथे गेल्या होत्या.
8.45 वाजता त्या घरी परतत असताना हिरा मोती पान शॉपजवळ त्या पोहोचल्या असता अचानक दुचाकीवरून दोन अज्ञात इसम त्यांच्या समोर आले. दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने रघुवंशी यांना झटका देत हाताने मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील अंदाजे 30 हजार रूपये किमतीचे, 14 ग्रॅम वजनाचे काळ्या मण्याचे सोन्याचे चैन मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून तोडले. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून तात्काळ पसार झाले.
दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेला इसम अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचा व अंगात लाल रंगाचे जर्किन व तोंडावर रूमाल बांधलेला होता. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.




