अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीबरोबरच बंद घरे फोडली जात आहेत. तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरील चोरट्यांनी ओरबाडून नेले तर कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन घरे फोडली. चार ठिकाणी झालेल्या घटनेत तीन तोळे सात ग्रॅम सोन्याचे दागिने, रोकड, चांदीचे दागिने असा एक लाख 20 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
रात्रीच्यावेळी जेवण झाल्यानंतर शतपावली करणार्या आहिल्या जगन्नाथ देशमुख (रा. समर्थ कॉलनी, गुलमोहोर रस्ता, सावेडी) यांच्या गळ्यातील सात ग्रॅमचे मंगळसूत्र विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडले. सावेडी उपनगरातील कोहिनूर मंगल कार्यालयामागे समर्थ कॉलनीत मंगळवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जगन्नाथ गोविंदराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरीची दुसरी घटना कोतवाली हद्दीत घडली. विजया विश्वजित काळे (रा. हनुमाननगर, अरणगाव रस्ता) या बुधवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून माणिकनगर येथून पायी घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण बळजबरीने ओरबाडून नेले. या प्रकरणी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालेगावच्या टांगेगल्लीतील घरातून लोखंडी कपाटाचे ड्रावर उचकटून दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. मंगळवारी रात्री 11 ते बुधवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविकांत सोन्याबापू अष्टेकर यांनी फिर्याद दिली आहे. तसेच केडगाव उपनगरातील भूषणनगरमधील निंबाळकर गणपती कारखान्यामागे राहत असलेले संदीप नामदेव ढगे (वय 47) यांचे घर फोडून चोरट्यांनी 10 हजारांची रोकड, 20 हजारांच्या दोन सोन्याच्या बाळ्या, 800 रुपयांचे जोडवे असा 30 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सदरची घटना मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेल्मेट गँग
सोनसाखळी चोरणारी हेल्मेट गँग शहरात सक्रिय झाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत या गँगने चार ते पाच महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडले आहेत. विना नंबरच्या दुचाकीवर दोघे जण येतात. त्यातील दुचाकी चालविणार्या व्यक्तीने हेल्मेट घातलेले असते तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो. रस्त्याने एकट्या चाललेल्या महिलेला गाठून पाठीमागे बसलेला व्यक्ती महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून ते पसार होतात.
‘डिटेक्शन’वर परिणाम
सोनसाखळी चोरीसह घरफोडी, बस स्थानकावरून महिलांचे दागिने चोरणे, दुचाकी चोरीच्या घटना दररोज घडत आहेत. पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून अपेक्षित तपास होताना दिसत नाही. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेतील मनुष्यबळ कमी झाल्याने त्यांनाही तपास करताना मर्यादा येत आहे.