अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोतवाली पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात एकाला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील एक लाख 64 हजारांच्या दोन तोळे सोन्यासह 70 हजारांची दुचाकी असा दोन लाख 34 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. साजिद सलीम शेख (रा. काटवन खंडोबा, अहिल्यानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात 8 डिसेंबर 2024 रोजी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला होता. वरील गुन्हा साजिद सलीम शेख व करण वाघेला यांनी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने साजिद सलीम शेख याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता वरील गुन्हा साथीदार करण वाघेला (रा. काटवन खंडोबा) याच्या मदतीने केल्याची माहिती दिली. त्याने आणखी एका चेन स्नॅचिंगचा गुन्ह्याची कबुली दिली.
दोन्ही गुन्ह्यातील चोरीचे दागिने शहरातील सराफ व्यावसायिकाकडे मोडल्याचे सांगितले. त्यानुसार सराफ व्यावसायिकाला बोलावून चौकशी केली असता साजिद शेख व करण वाघेला यांनी दोन वेळा सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने मोडण्यासाठी आणले होते. सराफाकडून एक लाख 64 हजारांच्या दोन तोळे सोन्याची लगड हस्तगत केली. साजिद शेख याने गुन्ह्यातील चोरीची दुचाकी काढून दिली. तीच दुचाकी वापरून दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे, पोलीस अंमलदार विशाल दळवी, संदीप पितळे, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सचिन लोळगे, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.