Saturday, July 27, 2024
Homeनगरचैन स्नॅचिंग गुन्ह्यातील टोळी जेरबंद

चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील टोळी जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील सराईत आरोपींच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. याप्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

आरोपींकडून एअरगन, तलवार, लाकडी दांडके, नायलॉन रस्सी, 6 मोबाईल फोन, 1 टीव्हीएस रायडर व 3 बजाज पल्सर मोटार सायकल, मिनीगंठण, सोन्याची चैन असा 5 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान, या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराविरुध्द गंभीर स्वरुपाचे 14 गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील, दिघी जाणार्‍या रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ, एमआयडीसी येथे अंधारात काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकला असता काही इसम अंधारात बसलेले दिसून आले. त्यांच्याकडे तेथे थांबण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमल्याची कबुली दिल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

योगेश सिताराम पाटेकर (वय 25, रा. वडाळा महादेव, श्रीरामपूर), अक्षय हिराचंद त्रिभुवन (वय 21, रा. वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर), बबलु उर्फ दानिश शौकत शेख (वय 24, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर), सुरेंद्र अशोक पवार (वय 20, रा. निमगाव, शिर्डी, ता. राहाता), साहिल महेश साळुंके (वय 18), शुभम वसंत वैद्य (वय 22) व सागर संतोष केदारे (वय 22, सर्व रा. जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडे 10 ग्रॅमचे मिनीगंठण, 5 ग्रॅमची अर्धवट तुटलेली चैन, 1 एअरगन, 1 तलवार, 3 दांडके, 1 नायलॉन रस्सी, विविध प्रकारचे 6 मोबाईल फोन, 1 टीव्हीएस रायडर व 3 बजाज पल्सर मोटार सायकल असा 5 लाख 61 हजार 500 रुपयांचा मुुद्देमाल मिळून आला.

आरोपीविरुध्द श्रीरामपूर शहर पोलिसात गुरनं. 824/23 भादंवि कलम 399, 402 सह आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिह्यातील फरार आरोपींवर कारवाईबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व पोहेकॉ संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अटक केलेला आरोपी योगेश सिताराम पाटेकर याने 31 जुलै 2023 रोजी श्रीरामपुरातील अशोक टॉकीज परिसरात एका महिलेच्या गळ्यातील गंठण तोडून आणल्याची कबुली दिली. योगेश पाटेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द दरोडा, जबरी चोरी, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या