Saturday, July 27, 2024
Homeक्राईमशिर्डीतील धूमस्टाईल चोरीचे कनेक्शन थेट मराठवाड्याशी

शिर्डीतील धूमस्टाईल चोरीचे कनेक्शन थेट मराठवाड्याशी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथे 28 मे रोजी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र धूमस्टाईलने चोरुन नेणारे चोरटे हे मराठवाड्यातील असल्याचे निष्पन्न झाले. शिर्डी धूमस्टाईल चोरी प्रकरण कनेक्शन आता थेट मराठवाड्यापर्यंत पोहोचले असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गंठण चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या चोरीच्या घटनेत विना नंबरच्या काळ्या पल्सरचा वापर होतो. 28 मे रोजी पिंपळवाडी रोडलगत दत्तनगर येथे बुलेट वरील अनोळखी तरुणांनी दुकानात बसलेल्या संगीता सुरेश बाबू रामलिंगम या महिलेच्या गळ्यातून साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढून नेले होते.

- Advertisement -

हा गुन्हा देखील शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर बुलेट, विना नंबरच्या दुचाकी व रेसर गाड्या पोलिसांच्या रडारवर आल्या होत्या. 30 मे रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकातील कर्मचारी सतपाल शिंदे व केवल राजपूत यांनी जीवावर उदार होऊन साकुरी शिवेजवळ शिताफीने पाठलाग करून बुलेटवरील दोन संशयित तरुणांना जेरबंद करून ताब्यात घेतले होते. त्यातील हे दोन तरुण मराठवाड्यातील असल्याने धूमस्टाईल चोरीचे कनेक्शन मराठवाड्याशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुलेटवरील शुभम मधुकर आधोडे, रामनगर गल्ली क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर (वय 25) व त्याचा मित्र राहुल कमलादास बर्डे (वय 24) रा. सिंधखेड चिंचोली, ता. घनसांगवी, जिल्हा जालना येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी 28 मे रोजी शिर्डीतील महिलेचे साडेतीन तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून मंगळसूत्राची बनवलेली 30 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व नवी कोरी बुलेट असा तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. रात्रीचा प्रवास करून थेट बुलेटवरून शिर्डीत येऊन धूमस्टाईल चोरी करून झटपट परागंदा होण्याची त्यांची पद्धत असल्याचे पुढे आले आहे. या दोघांची चौकशी सुरू असून या अगोदर शिर्डी येथे किती गुन्हे केले आहेत, त्यांच्यावर मराठवाड्यात गुन्हे दाखल आहेत का? तसेच यातून मिळालेले पैसे कोठे खर्च करत होते. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील अधिक तपास जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी हे करत आहे. या कारवाईत धूमस्टाईल चेन स्नॅचिंग पथकातील कर्मचारी इरफान शेख, अशोक शिंदे, बाबा खेडकर, गजानन गायकवाड, योगेश गरदास यांनी भाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या