Friday, May 24, 2024
Homeजळगावलाचखोर अभियंत्यासह पंटराला सक्तमजुरी

लाचखोर अभियंत्यासह पंटराला सक्तमजुरी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील भोरस बुद्रृक ते चाळीसगावपर्यंतच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर कामाचे मोजमाप करून बिले मंजूर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता राजेंद्र गणपत मोरे याने वीस हजारांची रुपयांची लाचेची मागणी केली होती.

- Advertisement -

लाच घेतल्याच्या आरोपात शाखा अभियंत्यासह दोघा आरोपींना दोषी धरुन न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी शुक्रवारी शिक्षा सुनावली आहे.

त्यात आरोपी जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता राजेंद्र गणपत मोरे (54, रा. चाळीसगाव) यास 4 वर्षाची तर लाच स्विकारणारा शेषराव ऊर्फ भोला अहिरराव (53, खेडी खुर्द, ता.चाळीसगाव ) यास तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील सुनील पाटील हे खाजगी ठेकेदाराचा व्यवसाय करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. सन 2015 मध्ये त्यांनी भोरस बुद्रृक ते चाळीसगावपर्यंतच्या रस्त्याचे काम केले होते.

त्यावेळी रस्त्याच्या कामाचे मोजमाप करून बिल मंजूर करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील चाळीसगाव उपविभागीय कार्यालयामधील शाखा अभियंता राजेंद्र मोरे यांच्याकडे होते. मात्र, सहा महिन्यांपासून ते टाळाटाळ करीत होते.

ठेकेदार सुनील पाटील यांच्या कामकाजाचे मोजमाप करून बिले मंजूर करण्यासाठी दि.21 जानेवारी 2015 रोजी शाखा अभियंता राजेंद्र मोरे यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम मोरे यांनी खाजगी इसम शेषराव अहिरराव याच्या मार्फत स्वीकारली व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले होते.

तपास पूर्ण केल्यानंतर तपासी अधिकारी डी.डी.गवारे यांनी दोषारोपपत्र जळगाव न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायासनासमोर सुरु होते. सरकारपक्षातर्फे मोहन देशपांडे यांनी चार साक्षीदार तपासले.

त्यात तक्रारदार सुनील पाटील, दिगंबर पाटील, तत्कालीन जि.प.सीईओ आस्तिककुमार पांडेय व तपास अधिकारी डी.डी.गवारे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

लाच प्रकरणामध्ये न्यायाधीश लाडेकर यांनी दि. 25 रोजी निकाल दिला. त्यात लाचखोर शाखा अभियंता राजेंद्र मोरेसह त्याच्या खाजगी पंटर शेषराव अहिरराव यांना दोषी ठरविण्यात आले.

यात आरोपी शेषराव अहिरराव याला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 12 नुसार 3 वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

तसेच शाखा अभियंता राजेंद्र गणपत मोरे यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड आणि कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 13 (1)(ड) व 13 (2) नुसार चार वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाचे आदेश केले असून दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या