अहिल्यानगर | Ahilyanagar
रिमझिम कोसळणार्या पाऊस धारा, मधेच ढगांच्या चादरीला बाजूला सारून डोकावणारा रविराज, अंगात हुडहुडी भरवणारा थंडगार वारा, डोंगरदर्यांना वेढणारे दाट धुके आणि त्या धुक्याच्या चादरीत क्षणाक्षणाला लपणारा-उगवणारा ऐतिहासिक चांदबीबी महाल… निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या या मनमोहक दृश्यांचा अनुभव सध्या शहा डोंगरावर येणार्या प्रत्येक पर्यटकाला मिळत आहे. त्यामुळे चांदबीबी महाल हा पावसाळी निसर्गप्रेमींसाठी ‘दि बेस्ट रेन डेस्टिनेशन’ ठरत आहे. ऊन पावसाच्या पाठशिवणीचा खेळ अनुभवण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत आहेत.
एक महिन्यापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाचे अल्प स्वरूपात का होईना पण आगमन झाले आहे.पावसाच्या हजेरी मुळे शहरासह गर्भगिरीच्या पर्वतरांगा हिरवा शालू नेसून तयार झाल्या आहेत. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे या ओळींचा प्रत्यय सध्या या परिसरात अक्षरशः येत आहे. गर्भगिरीच्या पर्वतरांगांमधील गोरक्षनाथ डोंगर, डोंगरगण आणि विशेषतः शहा डोंगरावरील ऐतिहासिक चांदबीबी महाल पावसाळ्यात अधिकच खुलून दिसत आहे. सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्षराजीमुळे संपूर्ण डोंगर हिरवागार शालू पांघरल्यासारखा भासतो. त्यात सतत कोसळणार्या श्रावणसरी आणि मधूनच डोंगराला वेढणारे धुके यामुळे संपूर्ण परिसराला स्वर्गीय रूप प्राप्त झाले आहे.
डोंगरावर येणार्या धुक्याच्या लाटा काही क्षणांतच चांदबीबी महालाला पूर्णपणे झाकोळून टाकतात आणि क्षणार्धात धुके विरताच महाल पुन्हा पर्यटकांसमोर दिमाखात उभा राहतो. निसर्गाचा हा अद्भुत लपंडाव प्रत्येकाला मंत्रमुग्ध करून सोडतो. महालाच्या दुसर्या मजल्यावर उभे राहिल्यानंतर वेगाने वाहणारा वारा, पावसाच्या तुषारांची अंगावर होणारी बरसात आणि समोर दिसणारा हिरवागार निसर्ग हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. डोंगरावरून दिसणारी मेहकरी, सोनेवाडी आणि परिसरातील गावे धुक्याच्या शुभ्र चादरीत हरवून जातात. त्या शांत, निवांत आणि निसर्गरम्य वातावरणात मिळणारा एकांत मनाला वेगळाच आनंद देऊन जातो.
महाबळेश्वरमध्ये अनुभवायला मिळणारा धुके, ऊन आणि पावसाचा खेळ आता अहिल्यानगरच्या शहा डोंगरावरही अनुभवता येत असल्याने सुट्टीच्या दिवशी तसेच भर पावसातही निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. सोशल मीडियावरही चांदबीबी महालाचे धुक्यात हरवलेले फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या ऐतिहासिक वास्तूचे पर्यटन महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात काही अविस्मरणीय क्षण अनुभवायचे असतील, तर शहा डोंगरावरील चांदबीबी महाल हे निश्चितच पर्यटकांसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरत आहे.त्यामुळेच निसर्गप्रेमी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत.
अनुभव अवर्णनीयच
चांदबीबी महल स्थळाचे ऐतिहासिक महत्व आहेच. वर्षभरात अनेक वेळा आम्ही या ठिकाणी येतो. पण पावसाळ्यात या ठिकाणी येणारा अनुभव आणि येथील निसर्ग सौंदर्य अवर्णनीयच आहे. अंगाला झोबणारा गार वारा, मधेच उन आणि मधेच पाऊस, डोळ्यांदेखत पावसाळी सरी आणि धुक्यात हरवून जाणार चांदबीबीचा महाल हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. येथे आल्यावर वेगळाच आनंद मिळतो. सगळे ताण तणाव कुठल्या कुठे पळून जातात आणि एक वेगळीच ऊर्जा घेऊन आपण या ठिकाणाहून जातो.
- – मयूर धाडगे (अहिल्यानगर)
अतिरेक नको
या ठिकाणी येणारे पर्यटक हे वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. अनेक जण कुटुंबासह आलेले असतात.अनेकांना या ठिकाणी नीरव शांतता अनुभवायची असते . तर काही अती हौशी पर्यटक मात्र साउंड लावणे, मोठ्याने ओरडणे अशा क्रियाही करतात.काही पर्यटक मोठ्या प्रमाणावर कचराही करतात.त्यामुळे इतरांना त्रासही होतो. अशा अती हौशी पर्यटकांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणीही अनेक पर्यटकांनी व्यक्त केली.




