चांदा |वार्ताहर| Chanda
नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात दोन दिवसांपासून ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले.
बर्हाणपूर, म्हाळस पिंपळगाव, महालक्ष्मीहिवरा, माका, रस्तापूर, कौठा, देडगाव, लोहारवाडी, मांडेमोरगव्हाण आदी परिसरात गेली दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यामुळे खरिपाच्या सर्वच पिकांची वाताहात झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागातील पिकांचे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे
यापूर्वी या परिसरात झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झालेच होते मात्र त्यानंतर तीन-चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला हायसे वाटले मात्र गेल्या दोन दिवसांपासून या गावामधील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाऊस अगदी ढगफुटीसदृश असल्याने काही मिनिटांत शेताचे तळे होऊन ओढ्या-नाल्यासारखे पाणी शेतामधून वाहत आहे.
त्यातच कहर म्हणजे पावसाबरोबर सोसाट्याचा वारा असल्याने सर्वच पिकांची वाट लागली आहे. कपाशी वार्यामुळे आडवी होऊन पाण्यात गेली असून ऊस पूर्णतः झोपला आहे. सोयाबीन पिवळे झाले तर शेंगा काळ्याभोर झाल्याने काढणीलायक राहिल्या नाहीत. काढलेल्या बाजरीच्या कणसांना कोंब फुटले आहेत.
नवीन उसाच्या लागवडी वाया गेल्या आहेत. जुन्या कांद्याला भाव वाढत आहेत मात्र नवीन कांद्याची पुर्णत: वाताहात झाली आहे. भाजीपाला तर शेतातच सडला आहे. त्यामुळे त्यांचेही भाव वाढले आहेत. कालच्या पावसाने तर परिसरातील कौतुकी, बार बोडी, खारी, कौठा, बर्हाणपूर आदी सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे रात्री बंद झालेली वाहतूक सकाळी दहा वाजेपर्यंत सुरळीत झालेली नव्हती.
खरिपाचे सर्वच पीक हातचे गेले असून बळीराजा पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत गेला आहे. करोनाने कोसळलेल्या शेती अर्थव्यवस्थेमुळे बळीराजा अगोदरच मेटाकुटीला आला आहे. निदान आता तरी कृषी विभागाने तत्परता दाखवत नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.