संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील धगाडी बाबा शिवारात तरुणाचा हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी (दि.22) सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की चंदनापुरी शिवारातील धगाडी बाबा शिवारात रामनाथ सूर्यभान गुरुकुले (वय 34) यास हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून ठार केले होते. त्याचे शरीर प्राण्याने खाल्लेल्या अवस्थेत शेतकरी विनोद रहाणे यांनी बघितले. त्यांनी तत्काळ सरपंच भाऊराव रहाणे यांना माहिती दिली.
त्यानंतर तालुका पोलीस व वन विभागालाही माहिती मिळाली. त्यावरून पोहेकॉ. आशिष आरवडे, अमित महाजन, पोना. सचिन उगले, पोकॉ. बाबासाहेब शिरसाठ यांसह वन विभागाचे वनक्षेत्रपाल सचिन लोंढे, वनपाल नामदेव ताजणे, वनरक्षक विक्रांत बुरांडे, गजानन पवार, शरद पांडव आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथून लोणी येथे नेमका मृत्यू कशामुळे झाला यासाठी मृतदेह पाठवला आहे. यावरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शेतकरी विनोद रहाणे हे घटनास्थळावरून घरी येत असताना बिबट्या शेततळ्याजवळ बसलेला त्यांना दिसला होता. याचवेळी मयत तरुण तेथे दुचाकी उभी करून बसलेला होता. मात्र, बिबट्या दिसल्याने रहाणे घाबरल्याने घरी आले. सकाळी पुन्हा शेताकडे गेले असता त्यांना हा गंभीर प्रकार दिसला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर मयताचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे निष्पन्न होईल. तसेच वन विभागाकडून या परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात आलेली आहे. नागरिकांनी खबरदारी घेऊन वन विभागाशी संपर्क साधावा.
– सचिन लोंढे (वनक्षेत्रपाल-भाग एक, संगमनेर)