मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
‘येळकोट-येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भंडार्याची मुक्तहस्ते उधळण करत श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास आज पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची मांदियाळी श्री खंडेराव महाराजांसह भगवती बाणाई माता व म्हाळसा देवीचे दर्शन घेण्यासाठी उसळली होती. मल्हार भक्तांतर्फे मुक्तहस्ते होत असलेल्या भंडार्याच्या उधळणीने चंदनपुरीने पिवळाधमक शालू पांघरला असल्याचे दृश्य दिसून आले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
श्रीक्षेत्र चंदनपुरी भगवती बाणाई मातेचे माहेर आहे. बाणाई मातेशी लग्न करण्यासाठी श्री खंडेराव महाराज यांनी चंदनपुरी येथे वास्तव्य केले असल्याने जेजुरीनंतर चंदनपुरीस मल्हार भक्तांमध्ये अनन्य साधारण महत्त्व असल्याने पौष पौर्णिमा, चंपाष्ठीच नव्हे तर वर्षभर भाविक येथे दर्शन व नवसपूर्तीसाठी हजेरी लावतात. पौष पौर्णिमेनिमित्त १५ दिवस चंदनपुरी येथे श्री खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात व जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे.
या यात्रोत्सवानिमित्त भगवती बाणाई मातेस मूळ लावण्यासह जेजुरी येथील मंदिरात प्रज्वलित केलेली मशाल ज्योत भाविकांतर्फे आणण्यात आली होती. या मशाल ज्योतीचे स्वागत हजारो भाविकांनी भंडारा उधळत केले होते. पौष पौर्णिमेनिमित्त आज सकाळी गावातील कौतिक अहिरे यांच्या घरातून देवाच्या मुखवट्यांसह मानाच्या काठ्यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविक या मिरवणुकीत सामील झाले होते. मिरवणुकीची सांगता मंदिरात झाल्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्नी अनितामाई भुसे यांच्यासह श्री खंडेराव महाराजांसह देवी म्हाळसा व बाणाई मातेची महापूजा करत विधीवत तळी भरली.
यावेळी जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते सुरेशनाना निकम, सरपंच विनोद शेलार, उपसरपंच कैलास शेलार यांच्यासह ट्रस्ट पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. महापूजा, आरती होऊन देवाची तळी भरली जाताच उपस्थित भाविकांनी भंडार्याची उधळण करत यात्रोत्सवास प्रारंभ केला.
शाकंबरी पौष पौर्णिमेचे औचित्य साधत पहाटेपासूनच हजारो भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर अक्षरश: फुलून गेला होता. कडाक्याची थंडी असतानादेखील भाविक वाहनांद्वारे चंदनपुरीत दाखल होत दर्शन रांगेत उभे राहत होते. महापूजा आटोपताच दर्शनासाठी भाविकांनी मंदिराबाहेर अलोट गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरल्या होत्या.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री खंडेराव महाराज व देवी बाणाई मातेच्या मंदिरास रंगरंगोटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला आहे. जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे विविध सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासह गावात स्वच्छता तसेच आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. चेंगराचेंगरी होऊ नये या दृष्टिकोनातून लोखंडी बॅरिकेडिंग तसेच गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्ट अध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली.
पंधरा दिवस यात्रोत्सव सुरू राहणार असल्याने खाद्यपदार्थांसह खेळणी, संसारोपयोगी साहित्य आदी वस्तू विक्रीची दुकाने थाटण्यात आले असून मनोरंजनासाठी पाळण्यांसह विविध करमणुकीचे उपक्रम यात्रेत थाटण्यात आले आहेत.
वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर
श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे यात्रोत्सवानिमित्त पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने महामार्ग ते चंदनपुरी गावापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचे प्रकार घडले. रविवारी दर्शनासाठी शहरासह राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. मात्र महामार्ग ते चंदनपुरीपर्यंतच्या रस्त्यावरच अनेक ठिकाणी दुकानी थाटल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने तासन्तास या कोंडीत भाविकांना अडकावे लागत असल्याने रस्त्यावर दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यासह महामार्ग ते गावापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेल्यास वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता होईल, अशी अपेक्षा अनेक भाविकांनी आज व्यक्त केली.




