Monday, July 22, 2024
Homeनगरचांदेकसारे, डाऊच बुद्रूक, घारी गावचा मुसळधार पावसाने संपर्क तुटला

चांदेकसारे, डाऊच बुद्रूक, घारी गावचा मुसळधार पावसाने संपर्क तुटला

सोनेवाडी |वार्ताहर|Sonewadi

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. काल झालेल्या पावसामुळे चांदेकसारे घारी या दोन गावाच्या मधून वाहणार्‍या जामनदीला पूर आला.

तर नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने घारी, चांदेकसारे, डाऊच बु गांवाचा संपर्क तुटला. तर चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाने तयार केलेला इस्लामवाडी चांदेकसारे रस्ता पाण्याने वाहून गेला.

गेल्या आठवड्यातही चांदेकसारे सोनेवाडी परिसरात ढगफुटी झाली होती. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात काल झालेल्या पावसाने अजून भर घातली. काल पावसाने रुद्र रूप धारण केले होते. सायंकाळी चार नंतर सुरू झालेला पाऊस तब्बल सहा वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. घारी व चांदेकसारे गावांना जोडणारा जाम नदीवरील पुल देखील पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला.

गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाकडे इस्लामवाडी व चांदेकसारे रस्त्याचीची मागणी केल्यामुळे त्यांनी त्या वेळी पावसात खराब झालेला रस्ता करून दिला. निकृष्ट पद्धतीने काम केल्यामुळे काल झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता वाहून गेला. ते नागरिकांचे मोठे हाल झाले.

या रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नळ्या टाकलेल्या होत्या. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट असल्याने त्या वाहून गेल्या. गंगाधर होन, आबासाहेब होन, रमजान शेख, दिलीप जगताप, मोहम्मद शेख, युनूस शेख, अहमद शेख, विनायक होन त्यांची घरे यामुळे पाण्यात गेली.

परिसरातील सर्व पिके पाण्याखाली असल्यामुळे आता काढणीवर आलेली सोयाबीन, मका देखील शेतकर्‍यांना मिळणार नाही. या सर्व परिसरातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुसकान भरपाई मिळावी. अशी मागणी चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या