मुंबई – Mumbai
कोरोना परिस्थितीत राज्य सरकारवर भाजप नेत्यांनी टीकेची एकही संधी सोडली नाही. परंतु, आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकारण दूर ठेवून एकत्र येऊया, असे आवाहनच राज्य सरकारला केले आहे. द्रकांत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे, या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की…
‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा द्यावा’, असे आवाहन केले आहे.
तसंच, महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेली कोरोना महामारीची समस्या कमी होताना दिसत नाही, उलट परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करू या, असे आवाहनही पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.