त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
उदयनिधींनी हिंदूधर्म व संस्कृती संपविण्याचे वक्तव्य केले ते शरद पवार व उध्दव ठाकरेंना मान्य आहे का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्र्यंबकेश्वर येथील श्री चंद्र गार्डन लॉन्स येथे विधानसभा ३०० बुथ प्रतिनिधी यांच्यासमवेत संवाद साधण्यासाठी व घरोघरी संपर्क अभियानानिमित्त आले असता केला….
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, भाजपसह राज्यात अकरा सहभागी पक्ष असून केंद्रात आम्ही सर्वजण मिळून महाराष्ट्रातून भाजपचे ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणू याची खात्री आहे. तसेच घरोघरी संपर्क अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष लोकांपर्यंत पोहचून त्यांचे म्हणणे जाणून घेत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी बावनकुळे यांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजूर यांच्यावरील संकट टळू दे व सगळ्यांचे जीवन मंगलमय होऊ दे अशी भगवान शंकराजवळ प्रार्थना केली.
तर नुकतेच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी देखील त्र्यंबकेश्वर येथे येऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांना पंकजा मुंडे यांच्या मागे लागलेल्या चौकशीबाबत विचारले असता ते म्हणाले की, देवदेवतांचे दर्शन याचा पुरेसा राजकारणाशी काहीही संबंध नसतो. दर्शन पुजेत एक मनःशांती व उर्जा मिळते. त्यामुळे याचे अनर्थ करु नये असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी बावनकुळे यांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर कुशावर्त तीर्थावर जाऊन दर्शन करुन तेली गल्ली व पाटील लेन भागातील नागरिकांशी संपर्क साधून भाजपाने केलेल्या कामांची पुस्तिका वाटली.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये बावनकुळे यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, तालुका अध्यक्ष विष्णू दोबाडे, शहराध्यक्ष वाडेकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी तसेच त्र्यंबकेश्वर तालुका व शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.