Friday, May 17, 2024
Homeनगरअजित पवार कर्तृत्ववान, त्यांना कोण डावलणार- बावनकुळे

अजित पवार कर्तृत्ववान, त्यांना कोण डावलणार- बावनकुळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर्योदय झाला होता. त्यांनी मोठे स्थान निर्माण केले होते, आता ते वगळून राष्ट्रवादीमध्ये अंधःकार निर्माण झाला आहे. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत, कारण आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसल्याने उर्वरीत राष्ट्रवादीचा अस्त होत आलेला आहे, त्यातूनच राहिलेल्या राष्ट्रवादीमधून अजितदादांना डावलले जात असल्याची भाषा सुरू झाली आहे, ते तर कर्तृत्ववान नेते आहेत, त्यांना कधीच कोणी डावलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

- Advertisement -

भाजपच्या ‘घर घर चलो’ अभियानची सुरूवात रविवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहरातील माणिक चौकातून करण्यात आली. तेथे पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रदेश महासचिव विक्रम पाटील, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नंतर माणिक चौक ते कापड बाजार ते तेलीखुंट या मार्गे पदयात्रा आयोजित करण्यात आली. यादरम्यान नागरिकांच्या भेटी घेत बावनकुळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान मोदी यांच्या योजनांची माहिती देणार्‍या पत्रकांचे वितरण केले.

आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष भाजपाचा ‘बी प्लॅन’ तयार आहे का, या प्रश्नावर बोलताना पाहून बावनकुळे म्हणाले, त्याची आवश्यकता नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निष्णात वकील आहेत. विधानसभेच्या परंपरा, पध्दती व निकालाचे पालन करून ते योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे बी प्लॅनची आवश्यकता नाही. सरकार इतके भक्कम आहे की 225 हुन अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला काही अडचण नाही. याशिवाय रोज अनेकजण पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करतात. 10 आमदारांची यादी आजच तयार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट, राष्ट्रवादीमधील अजितदादा गट यांचे स्थान काय या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, आमची महायुती आहे. ही युती सन्मानजनक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ‘एनडीए’ 13 घटक पक्ष आहेत, त्या सर्वांचा सन्मान ठेवला जाणार आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी व उद्योगपती आदानी यांच्या संबंधात भाष्य करतात, दुसरीकडे आता शरद पवार व आदानी यांची भेट झाली, यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले ‘इंडिया’ आघाडीची भूमिका रोज बदलत आहे. ‘इंडिया’मधील उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदुधर्म हद्दपार करण्याची, संपवण्याची भाषा केली. त्याबद्दल राहुल गांधी यांची काय भूमिका आहे, हे प्रथम जाहीर करावे. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नाही, ते केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या रक्तातच कर्करोग आहे, राहुल गांधी यांनी आधी उदयनिधी यांच्या भूमिकेबद्दल उत्तर द्यावे. उध्दव ठाकरे यांनाही मी तीनदा प्रश्न विचारला, ज्या हिंदुत्वाचा मुद्दा ठाकरे उपस्थित करतात, तो हिंदू धर्म हद्दपार करण्याची भाषा ‘इंडिया’ आघाडीतील उदयनिधी यांनी केली, त्यांच्यासोबतच ठाकरे यांनी युती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरिबांचे नेते आहेत, कैवारी आहेत, हे राहुल गांधी यांनी लक्षात घ्यावे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राहुरी, शेवगाव-पाथर्डी व पारनेर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा शेंडी बाह्यवळण येथील लॉन्समध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्याला आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते जिल्हा बँक अध्यक्ष शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तत्पूर्वी कर्डिले यांच्या बुर्‍हाणनगर निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहर, कर्जत-जामखेड व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या ‘वॉरिअर्स’ कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. पक्षाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार सुपर वॉरीयरने काम केले तरच त्या क्षेत्रातील आपला उमेदवार निवडून येईल. महाविजय 2024 साठी तुम्हाला प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 60 हजार नागरीक सरल अ‍ॅपद्वारे जोडावे, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या