Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशSmile please! 'प्रज्ञान रोव्हर'ने चंद्रावर केलं 'विक्रम लँडर'चं फोटोशूट, पाहा PHOTO

Smile please! ‘प्रज्ञान रोव्हर’ने चंद्रावर केलं ‘विक्रम लँडर’चं फोटोशूट, पाहा PHOTO

दिल्ली | Delhi

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने गेल्या आठवड्यात एक महत्त्वकांक्षी मोहीम फत्ते केली. भारताचं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ चं प्रक्षेपण झालं होतं. ४० दिवसांचा प्रवास करून चांद्रयान-३ चं ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडला आणि त्याने तिथे संशोधनाला सुरूवात केली आहे.

- Advertisement -

भारताचं चंद्रयान ३ मोहिम फत्ते झाल्यानंतर चांद्रयान-३ मिशनच्या रोव्हर प्रज्ञानने लँडर विक्रमचा फोटो घेतला आहे. हा फोटो शेअर करताना इस्रोने लिहिले ‘स्माइल प्लीज!’ रोव्हरवर बसवण्यात आलेल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्याने हे छायाचित्र काढल्याचे इस्रोने सांगितले. विक्रम लँडरसोबतच या फोटोमध्ये ChaSTE आणि ILSA हे दोन पेलोड देखील दिसत आहेत. इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्सच्या प्रयोगशाळेने हा विशेष कॅमेरा विकसित केला आहे. इस्रोने सांगितले की, रोव्हर प्रज्ञानने ३० ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३५ वाजता हा फोटो घेतला.

प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर फिरण्यास सुरुवात केल्यापासून काही दिवसांमध्येच मोठे शोध लावले आहेत. या रोव्हरवर असणाऱ्या LIBS पेलोडने चंद्राच्या मातीत कित्येक मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. यामध्ये ऑक्सिजन, अ‍ॅल्युमिनिअम, सल्फर, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियमची उपस्थिती दर्शवली आहे. यासोबतच, याठिकाणी मँगनीज, सिलिकॉन अशा घटकांचा समावेश आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजनचा शोध लावल्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर हायड्रोजनच्या शोधात आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाणी तयार होतं. त्यामुळे चंद्रावर हायड्रोजन आढळल्यास पाण्याची निर्मिती होण्याचा ठोस पुरावा हाती लागणार आहे. यादृष्टीने प्रज्ञानचं संशोधन सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या