पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या चांगदेवनगर येथील ऊस मळ्याच्या कारभाराबाबत महामंडळाच्या सेनापती बापट पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी गांभिर्याने दखल घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
25 जुलै 1963 मध्ये स्थापन झालेल्या या मळ्यावरील खंडकरी शेतकर्यांना अंदाजे 2148 एकर जमीन परत केल्यामुळे व अंदाजे 496 एकर जमीन संयुक्त शेती उपक्रमाबाबत कराराने दिल्यानंतर या मळ्यावर शिल्लक राहिलेल्या अंदाजे 259 एकर जमिनीवर सातत्याने होत असलेल्या अतिक्रमण तसेच या मळ्यावर पडून राहिलेल्या कोट्यावधी रुपयाच्या मालमत्तेबाबत तसेच अपुर्या कर्मचारी वर्गाविषयी दैनिक सार्वमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महामंडळाच्या या मळ्यावर काम करणारे अधिकारी तसेच कर्मचारी खडबडून जागे झाले. प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची माहिती काहींनी महामंडळाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यालय तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पोहच केल्याचे समजते. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालय सुद्धा खडबडून जागे झाले आहे.
या मळ्यावर तसेच वाड्यावस्त्यावर नेमके किती एकर अतिक्रमण झाले आहे. त्याबाबत आतापर्यंत काय पाठपुरावा केला आहे. याबाबत सद्द परिस्थिती काय आहे, याचा फिडबॅक घेतला जात आहे. महामंडळाची एकूण मालमत्तेची नेमकी किंमत किती आहे. येथील 17, 18, 19 वाडी लगत कर्मचार्यांच्या निवासात किती कर्मचारी राहतात, किती खोल्या आहेत, बाहेरच्या काही व्यक्ती राहतात का? तसेच कोणी कोणी पक्के बांधकाम कोणाच्या परवानगी केलेले आहे की नाही याची अद्ययावत माहिती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे चांगदेवनगर मळ्यावर अधिकारी, कर्मचार्यांची आणखी गरज आहे का? तसेच संगणक तज्ञाची मदत घेऊन कार्यालयाचे काम पेपरलेस करता येईल की नाही हा पर्याय देखील भविष्यात अजमावून पाहता येईल का याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.
ना. विखे यांनी जमिनीच्या मोजणीचे काम जलदगतीने करण्यासाठी रोव्हर पद्धतीची ज्यादा माशिन महसूल विभागाला उपलबध करून देण्याची घोषणा लोणी येथील महसूल विभागाच्या अधिवेशनात केली होती. शेती महामंडळाला सुद्धा ज्यादा मशिन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी चांगदेवनगर मळ्यावरील जमिनीची मोजणी होऊन अतिक्रमणे काढण्याबाबत तसेच महामंडळावर अनेक वर्षे काम करणार्या कर्मचार्यांना प्रत्येक दोन गुंठे जमिन द्यावयाची की नाही याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.