पुणे । प्रतिनिधी Pune
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी पाण्याचा व चा़र्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे. त्यामुळे दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे दिली. जमीन कसायची सोडू नका.लोकसभेत तुम्ही ताकद दाखवलीत. आता राज्यातील शेतकरीविरोधी सरकारही आपल्याला बदलायचे आहे, असा निर्धारही पवार यांनी बोलून दाखविला.
पवार तीन दिवसांच्या दुष्काळी दौ़र्यावर आहेत. बारामती, इंदापूरसह पुरंदरमधील गावांना यादरम्यान पवार यांनी भेट दिली. त्यानंतर तेथील शेतक़र्यांशीही पवार यांनी संवाद साधला. पवार म्हणाले, शेती आणि शेतक़र्यांची अवस्था आज बिकट आहे. त्यामुळे सरकारला शेतक़र्यांना अनुदान हे द्यावेच लागेल. अन्यथा, आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. शेतक़र्यांच्या प्रश्नासाठी मी कधीही रस्त्यावर उतरायला तयार आहे. आणखी चार ते पाच महिने थांबा. आपल्याला हे शेतकरीविरोधी सरकारच बदलायचे आहे. तुमच्या हातात ताकद आहे. निर्णय घेण्याच अधिकार तुमचा आहे. आम्हाला केवळ आपली साथ हवी आहे.
पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचीही पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने काही गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. या भागात तातडीने उपाययोजना करण्यासाठी कोणत्या योजना हाती घेता येतील, याची माहिती घेण्यासाठी मी आलो आहे. राज्यातील वातावरण बदलले आहे. मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र, अद्याप समाधानकारक स्थिती नाही. चारा, पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. त्यामुळे याप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहका़र्यांसोबत बैठक घ्यायची आहे.
तुम्ही मतांची कमतरता भासू दिली नाही
निवडणुकीत पावसाची कमतरता होती. पण, तुम्ही मतांची कमतरता भासू दिली नाही. महाविकास आघाडीच्या पदरात भरघोस मतांचे दान टाकले, अशी कृतज्ञता व्यक्त करीत सुप्रिया सुळे या मुलाच्या पदवीदान समारंभाला इंग्लंडला गेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. या सूचना लेखी स्वरुपातील आहेत. एकत्रित बैठकीतून हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करू, असेही पवार यांनी सांगितले.