एकत्र कुटुंब संस्था ही आपल्या संस्कृतीची धरोहर आहे. पूर्वीपासून या पद्धतीचा सकारात्मक विचार केला गेलेला आहे. एकत्र कुटुंबाला वटवृक्षाची उपमा दिली जायची. आजी, आजोबा, काका, काकू, आत्या, आई-वडील, सर्वांची मुलेबाळे अशी एकूण 25-30 माणसे, शिवाय घरगडी, शेतावरचे गडी, शिकणारी मुले असा जवळपास 50-60 लोकांचा राबता असयाचा. संध्याकाळी अंगणात तुळशीजवळच्या दिव्याची सांजवात झाली की आजीभोवती नातवंडांची गर्दी कथा ऐकायला जायची. अशी दृश्ये गावात घरोघरी दिसायची.
हा काळ फारसा जुना नाही. मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे एकत्र कुटुंबपद्धती फारकाळ तग धरून होती. निसर्ग नियमित होता. पाऊस-पाणी पिकांना पोषक असायचे. दर सुगीच्या दिवसांत कारभारणीच्या अंगावर नवीन दागिना चमकायचा. कुटुबांतील वडीलधारी खांदेपालट व्हायची. प्रसंगी सल्ला मात्र जरूर विचारला किंवा दिला जायचा. सुखाच्या कल्पना लिमिटेड होत्या. वातावरण शांत, समाधानी होते! हा सख्खा, हा चुलत असा भेदभाव नसायचा. एखादा भाऊ कमी शिकलेला असला तरी या रामरगाड्यात त्याचा निभाव लागून जात असे. संसार होत असे. अशा प्रकारे एकत्र कुटुंब पद्धती बराच काळपर्यंत नांदती होती.
पण कालांतराने ही पद्धत रोडावली. एकेरी कुटुंब पद्धती सुरू झाली. सुरुवातीला काहीकाळ यात आजोबा-आजी यांना स्थान होते. कालांतराने हम दो, हमारे दो! या मूलमंत्राने आपला प्रभाव वाढवला. ‘छोटे कुटंब, सुखी कुटुंब’ याला भरघोस मान्यता मिळाली आणि संयुक्त कुटुंब पद्धती उताराला लागली. पाश्चिमात्य संस्कृती अनुसरली जाऊ लागली. नोकरी शोधार्थ गावाकडचे स्वस्थ-शांत जीवन सोडून शहराकडे वाटचाल होऊ लागली. गावाकडची प्रशस्त घरे रिकामी होऊ लागली. शहरात छोटी छोटी घरे सजू लागली. सणावारापुरते गावाकडे जाणे फक्त उरले.
पण कोणताही बदल कायमस्वरुपी नसतो. त्या-त्या बदलाची एक ठराविक काळापर्यंतच चलती असते. विभक्त कुटुंब पद्धतीचे काही चांगले तर काही अतिशय वाईट परिणाम भोगल्यावर परत निसर्गाकडे (बॅक इ नेचर) लोक आजकाल वळू लागले आहेत. काही जणी अजूनही फक्त नवरा हवा! आई-वडील नको, असेही म्हणतात. पण एक मुलींचा वर्ग असा आहे ज्यांना घरात माणसे हवीशी वाटतात. आज बदलत्या काळानुसार घडणार्या अपघातानुसार पुन्हा संयुक्त कुटुंबांची संख्या वाढताना दिसतेय. आज कितीतरी नामवंत घराणी पिढ्यान्पिढ्या एकत्र नांदताना दिसून येतात. आपला व्यवसाय, नाव कमावताना दिसतात.
काही वेळेला आम्हाला घरात मोठी माणसे हवी, असाही आग्रह धरला जातो. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसेच या प्रकारात दोन मतप्रवाह आढळतात. उत्पती स्थिती निवृती याप्रमाणे. नवीन पुन्हा येऊ लागेल किंवा आलेले आहे. काळाच्या ओघात बर्याच पद्धती बदलतात. जुुन्याच पद्धती नवीन विचाराने सजून आपल्यासमोर येतात. मध्यंतरीच्या काळात कोर्ट मॅरेज फार लोकप्रिय होते. त्या लोकांना आधुनिक समजले जात असे. पण आज पुन्हा विवाह चार-पाच दिवसांचे होऊ लागलेत. त्यामुळे पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीचे रोपटे मूळ धरू लागले आहे. गेल्या दोन वर्षांत करोना प्रकरणी आलेल्या एकटेपणात सर्वांची सोबत, सहवास, आपुलकी वाढीला लागली आहे. आपापसातील हेवेदावे कमी होऊ लागलेत. जीवनाचे क्षणभंगुरत्व प्रत्येकाला उमगले जात आहे. म्हणून एकमेकांना धरून राहू, या विचाराने पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रूढ होऊ लागली आहे. हा फरक विचार निश्चितच स्वागतार्ह आहे. हो ना?
– अरुणा सरनाईक