Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधघराघरात बदलत गेलेली भाषिक चव!

घराघरात बदलत गेलेली भाषिक चव!

सैपाकघराचं स्वयंपाकघर आणि नंतर स्वयंपाकघराचं किचन होताना जो बदल झाला त्यात भाषेने बरेच काही गमावले आहे; हरकत नाही पण जे मूळ आहे त्याला विसरू नये इतकेच!

स्वयंपाकघराचे किचन झाले आणि कोरड्यास म्हणजे कोरड्या पदार्थासह खायची पातळ भाजी, कालवण म्हणजे ज्यात कालवून खायचे असा पातळ पदार्थ… हे मागे पडून कोणत्याही भाजीला फक्त भाजी म्हणण्याची प्रथा सुरू झाली. अगदी काहीच वर्षांपूर्वी ‘भाजी घेऊन येतो गं…’असे म्हणत नवरा हातात डबा घेऊन बाहेर पडायचा उशीर की घरातील कारभारीण पाटा-वरवंटा काढून मसाला वाटायला घ्यायची. गल्लीत घमघमाट सुटायचा. सैपाकघराचे स्वयंपाकघर आणि नंतर स्वयंपाकघराचे किचन होताना जो बदल झाला त्यात भाषेने बरेच काही गमावले आहे; असे म्हणायला नक्कीच वाव आहे. दर कोसावर भाषा बदलते; हे जरी खरे असले तरी ती इतक्या झपाट्याने बदलते, हे कळायला आता वेळ लागत नाही. अगदी महाराष्ट्री भाषेपासून थोड्याफार फरकाने भाषिक शुद्धिकरण होत-होत बोलीभाषेवर प्रमाणभाषा कुरघोडी करत राहिली आहे आणि आजतर प्रमाणभाषेच्या जोडीला अनेक परकीय भाषांनी बोलीभाषेचे कंबरडें मोडायला घेतले आहे; असे वाटते. आक्रमण हे वाईटच; मग ते शत्रूचे असू दे नाहीतर स्वकियांचे, विचारांचे असू दे नाहीतर अविचारांचे. मौनाचे असू दे नाहीतर भाषेचे… एकदा का आक्रमण झाले की त्याला परतवून लावताना काहीतरी का असेना पण शक्ती खर्च करावीच लागते. त्यामुळे आक्रमणच होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. पण मराठी भाषेच्या बाबतीत ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ म्हणत आपणच आपल्यावर दोषारोपपत्र दाखल करून घ्यावे लागेल. कारण आपणच आपल्या या भाषेचा भरजरी काठ सोडून फॅन्सी चकचकीत शिफॉनचा पदर हातात घेत त्याचे गोडवे गात राहिलो आहे.

आपल्या घरातील संवादाची मूळची भाषा बदलून तिने आज पुस्तकी संवादाची जागा घेतली आहे. घरी येण्यास उशीर झाला तर घराच्या ओट्यावर अंधारात फारसे दिसत नसले तरी आईवडील, आजीआजोबा कोणीतरी रस्त्याला डोळे लावून बसलेले असायचे आणि आपण पायरीवर पाय ठेवताच, ‘लै वखुत केला लेकरा, झुंझुरकं पडायच्या अगुदर घरची वाट धरत जाय’ या वाक्याने आपले स्वागत व्हायचे. पण आज ती वेळच येत नाही. एकतर घरात कुणी कुणाची फारशी वाट पाहत नाही. कारण घरातील सदस्यांची संख्या मर्यादित झाली आणि दुसरे म्हणजे हातात मोबाईल आले. प्रत्येक मिनिटांचे अपडेट तिथे देता येते. आज आजी-आजोबांची ती भाषा आम्हाला खेडवळ वाटू लागली आहे. असेना का, पण तिच्यातील गोडवा, प्रेम, ओलावा, काळजी हे सगळे सुवासिनींच्या कुंकवाइतके ठाशीव नक्कीच होते. संस्काराच्या मेणावर घट्ट लावलेल्या त्या कुंकवाची जागा जशी तयार टिकल्यांनी घेतली तशी मराठी मातृभाषेची जागाही संमिश्र भाषेने अलगद हेरली आणि तिच्यावर कब्जा मिळवला.

- Advertisement -

मुळात भाषा का बदलत गेली; याचा अगदीच कमी शब्दात आढावा घ्यायचा झाला तर तीन शब्दात ते सांगता येईल. ते शब्द म्हणजे-स्थलांतर, शिक्षण आणि संगत! रोजगाराच्या निमित्ताने माणसे घराबाहेर पडली. शिक्षणाने त्यांना नोकर्‍या दिल्या आणि ही माणसे गावापासून, आपल्या माणसांपासून दुरावली. माणसांची संगत बदलली आणि प्रत्येकाची धडपड सुरू झाली या परक्या ठिकाणी आपले पुनर्वसन करण्याची. तिथल्या संवादाची भाषिक गरज म्हणून माणसांनी तिथल्या भाषेला आपलसे केले आणि निसर्गाच्या नियमानुसार ज्याची गरज सरली ते गळून पडू लागतं. मराठी भाषेचेही तसेच झाले. माणसे ज्या प्रदेशात राहू लागली तिथली भाषा त्यांनी स्वीकारली आणि गावाकडची भाषा तशीच गाठोड्यात कुजत राहिली. मग आमच्या मुलांना तिचा कुबट वास येऊ लागला आणि त्यांनी तिला जवळ करायला नाकं मुरडायला सुरुवात केली. इतकी की ती भाषा बोलणारे त्यांना असभ्य, अडाणी किंवा गावंढळ वाटू लागलेत. त्यांनी आमच्यापेक्षाही त्यांची भाषा आणखी वेगळीच केली. करेनात का, हरकत नाही पण जे मूळ आहे त्याला विसरू नये इतकेच!

घरातल्या जाड्याभरड्या मिठाची जागा आयोडिनयुक्त मिठाने घेतली आणि घरात दृष्ट काढायलाही ते मीठ पारखे झाले. मिठाला संध्याकाळी गोड असे म्हणण्याचीही रीत होती पण आज ते कोणाला समजणारही नाही. चिखट, तेलकट, काजळी, केरसुणी, भरडगं, ओसरी, माजघर, न्हाणीघर असे घरातील आणि रोजच्या वापरातील कितीतरी अस्सल शब्द आज काळाच्या पडद्याआड गडप झाले. भोगुण्याची जागा पातेल्याने, पेल्याची जागा ग्लासने, ताटलीची जागा ताटाने, ओसरीची जागा हॉलने घेतली. सदरा आता शर्ट झाला तर इजार आता सर्रास पॅन्ट म्हणून मिरवू लागली. लुगड्याची जागा साडीने घेतली तर अंथरुणाची जागा बेडने घेतली. शेतीच्या औजारांचा तर प्रश्नच नाही. शेती करण्याची पद्धत बदलली आणि नांगर, वखर, मोट-नाडा हेही गंजून बाजूच्या कचर्‍यात कायमचे गेले.

शिक्षण म्हणजे पाटी-पेन्सिल, काळा फळा, गुरुजी किंवा बाई असे आता राहिले नाही. पाटीची जागा कालपरवापर्यंत वही-पेनाने आणि आता टॅबने घेतली तर काळा फळा जाऊन तिथे ग्रीन बोर्ड किंवा व्हाइट बोर्ड आला. ऑनलाईन शिक्षणाने बाई आणि गुरुजींना मागे टाकले. याचाच अर्थ शिक्षण बदलले, संकल्पना बदलल्या आणि त्यानुसार भाषाही बदलली. मूल्यशिक्षणाची जागा गरजाधिष्टीत, कौशल्याधिष्टीत शिक्षणाने घेतली आणि माणसे प्रमाणापेक्षा जास्त अपडेट झाली. त्यांनी संगणकाची भाषा शिकून घेतली. घरातील मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकू लागली. पालकांनाही ती भाषा मुलांसाठी स्वीकारावी लागली, शिकावी लागली आणि मराठी भाषेत इंग्रजी शब्द सहज रुळू लागले. शाळा स्कूल झाली, वर्ग क्लास झाला, शिक्षक टीचर झाले, आईवडील पॅरेंट झालेत. अभ्यास होमवर्क झाला आणि कोणतेही काम मग जॉब झाला. आम्ही आता वरवंटा-पाट्यावर वाटण नाही करत तर मिक्सरमध्ये ग्राइंड करतो. न्याहरी नाही तर ब्रेकफास्ट करतो.

‘मराठी मातीचा टिळा ललाटास…’ लावताना आम्ही परकीय भाषाही जवळ करत असू तर हरकत नाही पण मूळचा हा झरा आटणार नाही; याची काळजीही आपल्याला घ्यावीच लागेल. नाहीतर अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पाहता-पाहता आपल्यालाच आपली भाषा चाळणीतून गाळून घ्यावी लागेल. तो दिवस नको असेल तर आपल्या भाषेवर आपण स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करू, तिचे जतन करू… अशी शपथ प्रत्येकाने आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने घेऊ या.

राजेंद्र बापूराव उगले, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या