Saturday, May 25, 2024
Homeनगरचासनळीचे वैद्यकीय अधिकारी साहिल खोत निलंबित

चासनळीचे वैद्यकीय अधिकारी साहिल खोत निलंबित

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

चासनळी (ता. कोपरगाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिचा अतिचा रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी सायंकाळी सेवा निलंबनाची कारवाई केली. यासह एक डॉक्टर व रूग्णवाहीकेचा चालक अशा दोघांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, कारवाडी येथील रहिवासी अशोक राणु वाघ यांची मुलगी रेणुका किरण गांगुर्डे ही द्वितीय प्रसुतीसाठी माहेरी आलेली होती. 3 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता रेणुका हिस प्रसुती कळा चालू झाल्याने तिला चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या परिचारिका यांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत धामोरी येथील उपकेंद्रात नेण्याचे सांगण्यात आले. वाघ यांनी अ‍ॅम्बुलन्सची मागणी केली असता वाहनास डिझेल उपलब्ध नसल्याचे सांगितले. अशोक वाघ यांनी मुलीस खासगी वाहनातून धामोरी उपकेंद्रात दाखल केले असता बाळाच्या प्रसुतीनंतर अती रक्तस्रावामुळे काही वेळात रेणुका हिचा मृत्यू झाला.

याप्रकरणीत माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि कोपरगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या पत्रानूसार डॉ. खोत यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला नसता तर संबंधीत गरोदर महिलेची वेळेत प्रस्कृती होवून तिचा जीव वाचला असता.

दुसरीकडे चासनळी आरोग्य केंद्रात दोन वैदयकीय अधिकारी यांची नेमणूक आहे. मात्र यापैकी एकही डॉक्टर त्या ठिकाणी हजर नव्हता. यामुळे या ठिकाणी आलेल्या गरोदर मातेला वेळेत प्रसूती सेवा मिळाली नाही. चासनळीचे वैद्यकीय अधिकारी खोत यांच्यावर कामाचे नियोजन न करणे, गरोदर महिलेला प्रसृतीचे उपचार न मिळाल्याने तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत त्यांच्यावर सेवानिलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. खोत यांच्या निलंबनाच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची सही आहे. यासह चासनळीचे दुसर्‍या डॉक्टर साक्षी सेठी व रूग्णवाहीकेचा चालक संजय शिंदे यांच्यावर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हयात जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी नेमणूकीच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राहतात की नाहीत हे तपासण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी बुधवारी रात्री 10 वाजता अचानक जिल्हयातील सर्व वैदयकीय अधिकारी यांची ऑनलाईन व्हिसीद्वारे बैठक बोलवली होती. यावेळी गैरहजर राहणार्‍यांचे काय होणार याकडे जिल्हयाचे लक्ष आहे.

दरम्यान जिल्हयातील प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकिय अधिकारी यांची नेमणूक आहेत. मात्र चासनळीच्या घटनेनंतर वैदयकीय अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी राहात नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकारी आणि एक वाहन चालक यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली असुन भविष्यात अशा घटना घडल्यास नेमणुकीस असलेले जिल्ह्यातुन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यावर थेट कारवाईचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी बुधवारी रात्री उशिरा झालेल्या डॉक्टरांच्या व्हिसीमध्ये दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या