अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
स्वस्तात दुचाकी देण्याचे आमिष दाखवून 25 हजार रूपयांना फसविण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामजी केदारनाथ चौधरी (वय 34 रा. वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना परिसर, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना 9 जुलै रोजी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ओ.एल.एक्स. कुरिअरमधून बोलत असल्याचे सांगितले. आपल्याकडे जुन्या दुचाकी आहेत. त्यांची विक्री करायची आहे, असे सांगून चौधरी यांचा विश्वास संपादन केला. होंडा अॅव्हिएटर मॉडेलच्या दुचाकीचा दोघांमध्ये व्यवहार ठरला.
चौधरी यांनी दुचाकीच्या व्यवहारासाठी 25 हजार रुपये संबंधिताने सांगितलेल्या बँक खात्यात पाठविले. त्यानंतर त्यांनी 11 जुलैपासून सातत्याने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो फोन बंद करण्यात आला. ऑनलाईन पैसे पाठवूनही दुचाकी न मिळाल्याने अखेर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती – तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.