नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar
खा.अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचे नाव सांगून पोलिसांची फसवणूक करणार्या भामटयाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.1 जून 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर 09373939113 या क्रमांकावरुन काहीतरी काम असल्याचा 11 वाजता एसएमएस आला. त्यानी तात्काळ त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांना मदत करण्यास सांगीतले.
त्याअन्वये पीएसआय मोहिते यांनी तात्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी प्रबोधचंद्र सावंत असे नाव सांगून ते खा.अमोल कोल्हे यांचे पीए असल्याबाबत कळविले. त्यांच्या मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असल्याचे सांगून त्यांना तातडीने मदत करावी म्हणून सांगितले. तसेच त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक 09834395809 यावर पीएसआय मोहिते यांनी तात्काळ संपर्क केला असता, सदर कॉलरने त्याचे नाव रविकांत मधुकर फसाळे असे सांगितले. त्यांच्या बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होवून 4 लोक मयत व 7 ते 8 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत असे सांगितले. त्याबाबत नियंत्रण कक्ष यानी तातडीची मदत होण्याकामी माहिती घेतली असता असा अपघात झाला नसल्याचे समजले.
त्यानंतर सदर मोबाईल क्रमांक 09834395809 यांनी पुन्हा पीएसआय मोहिते यांना कॉल करून त्यांना तात्काळ अॅम्ब्युलन्सने शिवाजीनगर पुणे येथे जायचे असल्याने वाहनात डिझेलसाठी 7 हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. ही बाब खासदारांचे पीए प्रबोधचंद्र सावंत यांना सांगितली. तसेच पोलीस मदत देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा रविकांत मधुकर फसाळे यांनी पीएसआय मोहिते यांना थोड्या वेळाने पुन्हा कॉल करून सांगितले की, सकाळपासून काहीही खाल्ले नाही उपाशी आहोत, कृपया जेवणासाठी 2 हजार रुपयांची मदत करावी, जेणेकरून ते प्रवासादरम्यान काहीतरी जेवण करतील. पीएसआय मोहिते यांनी प्रबोधचंद्र सावंत यांना विचारले. त्यांनी अपरात्र असल्याने व दूर प्रवास करणे असल्याने तसेच खा.अमोल कोल्हे यांचा मदत करण्याबाबतचा निरोप आहे, असे सांगितले. पीएसआय मोहिते यांनी माणूसकीच्या नात्याने कॉलर मोबाईल क्रमांक 09834395809 धारक रविकांत मधुकर फसाळे यांच्या फोन पे अकाऊंटवर 1 हजार रुपयांची मदत पाठविली. आज दि.2 जून रोजी मोहिते यांनी नियंत्रण कक्षामार्फत खात्री केली असता अशा प्रकारची अपघाताची घटना ही नंदुरबार जिल्हा हद्दीत तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यात देखील घडलेली नसल्याचे समजले. त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांक 09834395809 धारक रविकांत मधुकर फसाळे यांनी खा.अमोल कोल्हे यांचे पीए प्रबोधचंद्र सावंत यांचे नाव सांगून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहिती देवून पोलिसांची आर्थिक फसवणूक केली तसेच पोलीस खात्याला अपघाताबाबत खोटी माहिती देवून विनाकारण कामाला लावून शासकीय कामकाजाचा वेळ वाया घालवला आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 420, 182 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.