- निफाड । प्रतिनिधी Niphad
निफाड तालुक्यातील आर्थिक विकासाचे चक्र असलेल्या उत्तरपूर्व पट्टयातील रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा ऊस गळीत हंगाम बंद राहणार असल्याने तालुक्याचे आर्थिक चक्र थांबणार आहे. आमदार दिलीप बनकर यांनी रासाका कामगार व निफाड तालुक्यातील ऊस उत्पादकांचा या निर्णयामुळे आर्थिक घात केला आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्ते, नागरिक विधानसभेची आकडेवारी मांंडत असतांना दीपावली सणानिमित्त बोनस, पगार होऊन रासाका परिसरात नवचैतन्य येत होते व येथील कार्यस्थळावर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत होती. परंतु रासाकाचा गळीत हंगाम बंद राहणार असल्याने स्थानिक व्यावसायिक, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामागार, ऊस ट्रक चालक मालक यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
त्यामुळे विधानसभेचे वारे जरी निफाड तालुक्यात वाहत असले तरी रासाका कार्यस्थळावर सामसूम जाणवत असल्याने स्थानिक व्यावसायिक व कामगारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
आमच्या पोटापाण्याच्या प्रश्नाबाबत कुठल्याही पक्षाकडे वेळ नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीकडे आमचे लक्ष नसल्याचे त्यांंनी सांगितले. तर विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांनी रासाका हा पंधरा वर्षासाठी शासनाकडून भाडेपट्टयाने घेतला आहे. परंतु पंधरा वर्षासाठी गळीत हंगाम सुरू ठेवण्याची त्यांची जबाबदारी असुनही त्यांनी हा गळीत हंगाम बंद ठेवुन सभासदांच्या व ऊस उत्पादकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळेे तालुक्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे व शासनालाही भाडेपट्टा मिळणार नसल्याने यात शासनाचेही आर्थिक तोटा होणार असल्याने विद्यमान आमदार यांनी रासाका बाबत जो निर्णय घेतला तो सर्वस्वी चुकीचा असून त्यांना विधानसभा निवडणुकीत याची किंमत त्यांना ऊस उत्पादक, सभासद, कामगार व व्यावसायिक यांच्या रोषातून चुकवावी लागणार आहे, अशी टिका प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके यांनी केली आहे.
कारखाना बंद राहणे हे कामगार, व्यावसायिक, ऊस उत्पादक व सभासदांच्या आर्थिक दृष्टीने योग्य नाही. कारखाना गाळप क्षमता अत्यंत कमी असल्याने ऊस सहज उपलब्ध होऊ शकतो. कारण गोदाकाठ परिसरामध्ये रासाका सुरू राहील इतका ऊस असुन सुद्धा व आपल्या ऊसावर बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू राहू शकतात, तर रासाका बंद ठेवण्याचे कारण काय.
साहेबराव गायकवाड, कामगार नेते, रासाका