Friday, May 3, 2024
Homeक्रीडाचेन्नई दिल्ली आज भिडणार

चेन्नई दिल्ली आज भिडणार

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे….

- Advertisement -

चेन्नई आणि दिल्ली संघाच्या खात्यात १८ गुण जमा आहेत. मात्र सरस धावगतीच्या बळावर चेन्नई पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या विवो आयपीएल २०२१ मध्ये सुसाट असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा विजयरथ राजस्थान रॉयल्स संघाने रोखला. त्यामुळे पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी चेन्नई सज्ज आहे.

चेन्नई आणि दिल्ली संघाला यंदाच्या विवो आयपीएलच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे यामुळे आपला विजयीरथ बाद फेरीच्या दृष्टीनं असाच कायम राखण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत दोन्ही संघांमध्ये अनेक नौजवान आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्यामुळे एक रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.

मुंबईविरूद्ध शारजाह (Sharjah) येथे झालेल्या सामन्यात दिल्लीनं मुंबईला २० षटकात १२९ धावांवर रोखलं होतं. यामध्ये आवेश खान , अक्षर पटेल यांनी केलेल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे दिल्ली संघाला ही कामगिरी करता आली होती. मात्र १३० धावसंख्येचा पाठलाग दिल्ली संघाचे सलामीवीर शिखर धवन, पुथ्वी शॉ , स्टीव्ह स्मीथ स्वस्तात माघारी परतल्यामुळे दिल्ली संघाची दमछाक झालेली असताना माजी अनुभवी कर्णधार श्रेयस अय्यर रिषभ पंत आणि आर अश्विन यांनी केलेल्या निर्णायक फलंदाजीमुळे दिल्लीला रोमहर्षक विजय नोंदवून दिला होता. आता चेन्नईला दुसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी दिल्ली सज्ज आहे.

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात आत्मविश्वास गमावलेला चेन्नई सुपरकिंग्ज (Chennari Super Kings) पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला २० षटकात १८९ धावसंख्या उभारता आली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) फाफ डू प्लेसिसच्या साथीने संघाला आकर्षक सुरुवात करून दिली होती. डू प्लेसिस बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने सुरुवातीला संथ फलंदाजी करत संघाच्या डावला आकार दिला. खेळपट्टीवर जम बसल्यावर नंतर चौकार आणि षटकार खेचून आपलं शुंजार शतक साजरं केलं होतं. अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) त्याला सुरेख साथ दिली होती. मात्र सुरेश रैना , अंबाती रायडु (Suresh Raina & Ambati Raydu) या सामन्यात सपशेल अपयशी ठरले होते. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royal’s) संघाचे धडाकेबाज सलामीवीर इविन लुईस (Ewin Luise) आणि यशस्वी जयस्वाल यांनी अवघ्या ५ षटकात ७५ धावा वसूल करत संघाच्या विजयाचा पाया अधिक मजबूत केला होता. मुंबईकर गोलंदाज शार्दूल ठाकूर वगळता उर्वरीत एकाही गोलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कंगगिरी करता आली नव्हती. शिवाय दीपक चाहरला (Deepak Chahar) या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय महागात पडल्याचे या सामन्यानंतर प्रकर्षाने दिसून आले होते. त्याच्याजागी संघात संधी मिळालेला के एम असिफ आपला प्रभाव पाडू शकला नव्हता.

आजच्या सामन्यात चेन्नई संघात दोन बदल केले जाण्याची शक्यता आहे. सॅम करणला (Sam Karan) राजस्थानविरुद्ध सामन्यात आपल्या गोलंदाजीतून प्रभावी मारा करण्यात अपयश आले होते. वगळून डीजे ब्रावो (DJ Bravo) संघात परतण्याची शक्यता आहे. तर दीपक चाहरला के एम असिफच्याजागी (KM Asif) संघात संधी मिळू शकते. दिल्ली आणि चेन्नई यांच्यात मागील झालेल्या ३ सामन्यांमध्ये दिल्लीनं चेन्नईवर मात केली होती. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई नव्या रणनीतीसह आज मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.

सलिल परांजपे नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या