Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहायुतीत वादाची ठिणगी! नांदगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ठोकला दावा; समीर भुजबळ मैदानात?

महायुतीत वादाची ठिणगी! नांदगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ठोकला दावा; समीर भुजबळ मैदानात?

मंत्री भुजबळांकडून समीर यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा, भुसे म्हणाले, "आम्ही येवल्यावर..."

नाशिक | Nashik

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून त्यादृष्टीने सर्वच पक्षांची जोमाने तयारी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti and Mahavikas Aaghadi) जागावाटपासह उमेदवारीबाबत चर्चा केली जात आहेत. यात दोन्ही आघाड्यांत उमेदवारीसह जागावाटपावरून वाद सुरु असल्याचे दिसत आहे. त्याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) पाहायला मिळाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ajit Pawar : अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार; माजी मंत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर

या मतदारसंघात सध्या महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे (Suhas Kande) आमदार आहेत. मात्र, याच मतदारसंघात आता महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी दावा ठोकला आहे. मंत्री भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना केलेल्या पोस्टमध्ये “नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेवून जाण्यासाठी उदंड आयुष्य लाभो असे म्हटले आहे. तर दुसरीकडे समीर भुजबळ अनेक दिवसांपासून मतदारसंघात तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे. भुजबळांच्या या शुभेच्छांवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निकाल…”

मंत्री भुसेंनी दिले भुजबळांना खणखणीत उत्तर

छगन भुजबळांनी पुतणे समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी त्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “नांदगाव विधानसभेत शिवसेनेचे सुहास कांदे आमदार (MLA) आहेत. दावा करणं ठिक आहे, लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. मात्र नांदगावमध्ये शिवसेनेचा आमदार असल्यामुळे ती जागा आमचीच आहे. आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर उचित होणार का? असे भुसेंनी म्हटले आहे. त्यामुळे नांदगावच्या जागेवरुन शिंदेंच्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे देखील वाचा : Women’s T20 World Cup : आज भारत-श्रीलंका आमनेसामने; कोण जिंकणार?

भुजबळांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

नाशिक जिल्ह्याच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही ते सक्षमपणे सांभाळत आले आहेत. त्यांची अभ्यासू व मेहनती वृत्ती, नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर कामाचा ठसा उमटविला आहे. आगामी काळातही ते अशाच पद्धतीने ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास आहे. समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या