Tuesday, May 20, 2025
HomeनाशिकChhagan Bhujbal : अखेर भुजबळ मंत्रिमंडळात; 'असा' आहे भुजबळांचा राजकीय प्रवास

Chhagan Bhujbal : अखेर भुजबळ मंत्रिमंडळात; ‘असा’ आहे भुजबळांचा राजकीय प्रवास

नाशिकचे पालकमंत्री होणार ?

महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे नाराज होते. त्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. यानंतर अखेर छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आज सकाळी दहा वाजता ते राजभवनात मंत्रीपदाची घेणार आहे.  या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकि‍र्दीबाबत.
छगन भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर, 1947 रोजी नाशिक येथे झाला. त्यांनी मुंबईतील व्ही. जे. टी. आय.मधून मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविकेपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तरुणपणीच त्यांनी शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. त्यामुळे त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. मात्र शेतीसोबतच अगदी सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील त्यांना रस होता त्यामुळे ते राजकारणाकडे वळाले.
भुजबळ यांची राजकारणाची सुरुवात ही शिवसेना पक्षातून झाली आहे. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर 1973 साली मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 1973 ते 84 या काळात त्यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. यानंतर 1985 मध्ये पहिल्यांदा तर 1991 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी मुंबईचे महापौर होण्याचा मान मिळविला.
त्यानंतर 1985 व 1990 या काळातील सलग दोन विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील माझगावमधून मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर निवड गेले. यानंतर भुजबळ यांनी नोव्हेंबर 1991 ते 1995 या विधानसभेच्या कार्यकाळात राज्याच्या महसूलमंत्री,  गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री म्हणून काम केले.
यानंतर भुजबळ यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यावर त्यांची एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हापासून भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तसेच या पक्षाचे ते महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते असून ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत.
1999 साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात आल्यावर भुजबळ यांनी 18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती देखील सांभाळली. तर एप्रिल 2002 मध्ये त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यावर एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन्ही पदाची धुरा सांभाळली.
त्यानंतर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणूकीत ते विजयी झाले. यावेळी राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले असता त्यांनी नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री तर 8  डिसेंबर 2008 रोजी पुन्हा एकदा  महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषविले. भुजबळ हे येवला मतदारसंघातून 2009 मध्ये दुसऱ्यांदा, 2014 मध्ये तिसऱ्यांदा, 2019 मध्ये चौथ्यांदा तर 2024 मध्ये सलग पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.
तसेच दि. ११ नोव्हेंबर २०१० रोजी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली असता या फेररचनेमध्ये भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाच्या मंत्री पदाचा कार्यभार कायम ठेवून त्यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दि.२८ नोव्हेंबर २०१९ पासून त्यांच्यावर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच
महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळ यांच्यावर २ जुलै २०२३ रोजी पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
दरम्यान, भुजबळ यांनी राजकीय कारकीर्दीत आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासप्रक्रियेत देखील ते सातत्याने मोलाची कामगिरी बजावत आले आहेत.
विविध संस्थांवर भुजबळ यांनी केले आहे काम – 
छगन भुजबळ यांनी मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम केले आहे. तसेच वांद्रे – मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची देखील स्थापना केली आहे.
भुजबळांनी विविध देशांना दिल्या भेटी – 
भुजबळ महापौर असताना त्यांनी १९० मध्ये ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच ओसाका, जपान येथे १९९० साली झालेल्या जगातील महापौरांच्या परिषदेत शिष्टमंडळासह ते सहभागी झाले होते. तर १९८० आणि १९८६ मध्ये भुजबळ यांनी व्यापक परदेशी दौरा केला. त्यांनी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, स्वित्झरलँड आणि रशिया या देशांना भेटी दिल्या.
तसेच ऑक्टोबर 2000 मध्ये भुजबळ यांनी फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड या देशांचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने 28 मे ते 18 जून, 2001 या काळात न्यूयॉर्क, जिनीव्हा, लंडन या शहरांचा दौरा केला.  तर 2002 या वर्षी केंद्रीय पर्यटन तसेच नागरी हवाई उड्डाण मंत्री यांनी मध्य पूर्वेतील तसेच पश्चिम आशियाई देशातील पर्यटकांना भारतात आकृष्ट करण्यासाठी नेलेल्या शिष्टमंडळात भुजबळ यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार भुजबळ यांनी दि.19 मे ते 24 मे, 2002 या कालावधीत दुबई, बहरीन, मस्कत आणि अबुधाबी या देशांचा दौरा करुन महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर भुजबळ यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2002 या कालावधीत अमेरिका,कॅनडा आणि युनायटेड किंगडम या देशांना भेटी दिल्या. तसेच 6 ते 14 नोव्हेंबर 2002 या कालावधीत लंडन येथे भरलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट या जागतिक पर्यटन विषयक प्रदर्शनास भेट देण्यासाठी व महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची या प्रदर्शनामार्फत जागतिक पातळीवर प्रसिध्दी करण्यासाठी त्यांनी लंडनला भेट दिली. तर भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची छगन भुजबळ यांनी दि. 5 नोव्हेंबर, 2010 रोजी मुंबई येथे भेट घेतली आणि त्यांना महात्मा ज्योतीराव फुले यांनी लिहिलेल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवाद ग्रंथ भेट दिला.
त्या काळात अद्ययावत माहिती देणारी प्रसारमाध्यमे किंवा साधनसामग्री नसतानाही महात्मा फुले यांनी हे पुस्तक अमेरिकेतील अफ्रो-अमेरिकन जनतेच्या लढयाला अर्पण केल्याची बाब भुजबळ यांनी  ओबामा यांना सांगितली. त्यावेळी स्वत: ओबामा सुध्दा काही क्षण अवाक झाले आणि ‘इट इज अ ग्रेट-ग्रेट गिफ्ट फॉर मी’ अशा शब्दांत  भुजबळ यांचे आभार मानले. अमेरिकेत परतल्यानंतर ओबामा यांनी भुजबळ यांना प्रतिभेटीदाखल एक स्वाक्षांकित चांदीचा ग्लास पाठविला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...