नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थासाठी नाशिक शहरात (Nashik City) कायमस्वरूपी भूसंपादन करून प्रश्न मार्गी लावावा. नमामि गोदा आराखड्याला मंजुरी देऊन कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. गोदावरी पात्रात जाणारे ड्रेनेजचे पाणी थांबविण्यात यावे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) कुशावर्त कुंडात पाणी स्वच्छ करणारे यंत्र बसवावे त्र्यंबकेश्वरमधून वाहणाऱ्या गोदावरीची देखील स्वच्छता करण्यात यावी. नाशिक शहराला टायरबेस नको तर इतर शहरांप्रमाणे रेग्युलर मेट्रो सुरू करण्यात यावी. इतर मागासवगीय विकास व वित्त महामंडळाचे भाग भांडवल १ हजार तर वसंतराव नाईक विकास महामंडळाचे भाग भांडवल ५०० कोटीने वाढवावा. तसेच सारथी, बार्टी, महाज्योतीसह सर्व संस्थांना समान निधी देण्यात यावा व ओबीसी विद्यार्थ्यांचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, भोजन भत्ता आणि निर्वाह भत्त्वाचे पैसे वेळेवर देण्यात यावे. यासह विविध मागण्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात केल्या.
अर्थसंकल्पावरील (Budget) अनुदानावरील चर्चेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नगरविकास आणि इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत चर्चा करून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यामध्ये ५ कोटी भाविक पर्यटक येणे अपेक्षित आहे. कुंभमेळा (Kumbmela) यशस्वीरीत्या पार पाडावा यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर दळणवळण, परिवहन, पाणीपुरवठा, राहण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, विद्युतव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, वाहनतळ व्यवस्था इत्यादी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने नियोजन आणि त्याची प्रभावशाली अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेसह विविध विभागांचा जवळपास १५ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा शासनाला पाठविला आहे. त्याचे पुढे काय झाले ते अद्याप कळाले नाही. त्यामुळे या आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी देण्याची आवश्यकता आहे.
ते म्हणाले की, सिंहस्थ आराखड्यातील (Simhastha Plan) विविध कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्वाचा प्रश्न साधुग्राम आणि अन्य विकासकामांसाठी भूसंपादनाचा असतो.यासाठी आतापासून नियोजन केले तरच भूसंपादन करून त्या ठिकाणी कामे करता येतील. सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईघाईत कामे केली तर त्या कामांना दर्जा राहत नाही, विकासकामे दर्जेदार आणि दिर्घकालीन होण्यासाठी ती विशिष्ट कालमयदित होणं आवश्यक आहे. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी कायमचे भूसंपादन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
नमामि गोदा आराखडा-शासनाने लवकर निधी मंजूर करावा
अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी नाशिकच्या महत्वाकांक्षी नमामि गोदा प्रकल्पाची घोषणा केली. गोदावरी स्वच्छतेसारख्या महत्वाच्या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले. गोदापात्रामध्ये शहर परिसरातील उद्योगांसह निवासी भागातील सांडपाणी सुद्धा मिसळत असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांमधूनही गोदावरीमध्ये सांडपाणी जाते. शहरातील प्रमुख ५० पैकी सुमारे २५ ठिकाणांवर ड्रेनेजचे सर्रास सांडपाणी गोदावरीमध्ये सोडले जात आहे. हे ड्रेनेजचे सांडपाणी तात्काळ बंद करून भूमिगत गटारींना जोडले जावेत. सिंहस्थामध्ये केवळ एसटीपींची संख्या वाढविणेच पुरेसे नाही तर गोदापात्रात सांडपाणी सोडणारी केंद्रे त्वरित बंद करून गोदापात्रातील पाणी आवश्यक दूषित होणार नाही यासाठी उपाययोजना असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा नदीकाठावरील परिसराचा विकास आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी नमामि गोदा प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आराखडा तयार करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, नेमका निधी केंद्र शासन देणार की राज्य शासन देणार याबाबत स्पष्टता नसल्याने निधी कधी मिळणार असा प्रश्न आहे. या प्रकल्पासाठी नाशिक महानगरपालिकेकडून १,८०० कोटी रुपयांचा पहिला, त्यानंतर २,७८० कोटी रुपयांचा दुसरा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून कुंभमेळ्याचा विकास आराखडा मंजुर झाला नसला तरी महानगरपालिकेने १ हजार ३७४ कोटीचा मलनिःसारण आराखडा अमलात आणण्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविली. आठवडा भरापासून ही निविदा प्रक्रिया गाजत आहे. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. गोदावरी स्वच्छता हा टिकेचा विषय नाही तर श्रद्धेचा विषय आहे. येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कुशावर्तात पाणी स्वच्छ करणारे यंत्र बसवा
भुजबळ म्हणाले की, त्र्यंचकेश्वर कुशावर्त तीर्थमध्ये पाणी स्वच्छ करणारे यंत्र बसवावे. त्र्यंबकेश्रमधून वाहणाऱ्या गोदावरीची स्वच्छता करण्यात यावी. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तयार केलेले शहराच्या बाहेरील आणि शहरांतर्गत असलेले दोन्ही रिंगरोडचे रुंदीकरण करून या रस्त्यांची सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. साधुग्राम जागेवर प्रगती मैदानच्या धर्तीवर कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.
नियमित मेट्रो सुरू करा
भुजबळ म्हणाले की, नाशिकची लोकसंख्या अधिक वाढत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये टायर बेस मेट्रो नको तर नियमित मेने सुरू करण्यात यावी. टावर बस मेट्टे मुळे नाशिकची स्काय लाइन खराब होऊ देऊ नका. अगोदरच मुंबईमध्ये सर्वाधिक स्काय वॉकमुळे मुंबईची स्काय लाइन खराब झाली आहे. त्यामुळे मुंबई मधील जे आवश्यक नसतील ते स्काय वॉक काढून टाकण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.